जहांगीर कलादालनाचे संकेतस्थळ बंद
By admin | Published: July 12, 2017 01:58 AM2017-07-12T01:58:14+5:302017-07-12T01:58:14+5:30
मुंबईतील जहांगीर कलादालनाचे संकेतस्थळ दोन महिने उलटूनही बंद असल्याने कलाकार-कलारसिकांची प्रचंड गैरसोय होते आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरातील प्रसिद्ध कलादालनांमध्ये गणले जाणारे मुंबईतील जहांगीर कलादालनाचे संकेतस्थळ दोन महिने उलटूनही बंद असल्याने कलाकार-कलारसिकांची प्रचंड गैरसोय होते आहे. दोन महिन्यांपूर्वी या कलादालनाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले होते, मात्र त्यानंतर काही काळ संकेतस्थळाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचा संदेश त्यावर दिसत होता, परंतु आता हे संकेतस्थळ बंद झाले आहे. त्यामुळे कला क्षेत्रातून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
जहांगीर कलादालनात आयोजित कलाप्रदर्शनांची माहिती आणि भविष्यातील कलाप्रदर्शनांची माहिती यावर दिसत असे. मात्र दोन महिन्यांपासून हे संकेतस्थळ बंद असल्याने प्रदर्शनांची माहिती पोहोचण्यात खंड पडला आहे. या ठिकाणी कलाप्रदर्शन आयोजित करण्यासाठी दीड वर्षापूर्वी बुकिंग केले जाते. शिल्प-चित्र क्षेत्रातील अनेक कलाकारांकडून या संकेतस्थळाला दररोज भेट दिली जाते, परंतु हे संकेतस्थळ बंद झाल्याने प्रदर्शनांना त्याचा फटका बसत आहे.
याविषयी जहांगीर कलादालन कार्यालयाच्या अधिकारी कार्थियानी मेनन यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, संकेतस्थळ बंद आहे. नवीन संकेतस्थळाचे काम पूर्ण झाले आहे. आज (बुधवारी) होणाऱ्या बैठकीत संकेतस्थळ सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. या संकेतस्थळाची प्रायोजक टाटा कंपनी आहे. संकेतस्थळ सुरू करण्यासाठी टाटा कंपनीकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. याचे सर्व निर्णय बैठकीत घेतले जातील. मात्र टाटा कंपनीने प्रायोजकत्वास नकार दिल्यास दुसरा प्रायोजक शोधावा लागेल, असेही मेनन यांनी स्पष्ट केले.