गणेशमूर्ती घडविण्यात जहाँगीर यांचा हातखंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 12:24 AM2016-08-23T00:24:06+5:302016-08-23T00:24:06+5:30

उदयोन्मुख कलाउपासक : विविध मूर्तींसह कलाकुसरीच्या वस्तू राज्यभर

Jahangir's handwork is to be constructed in Ganesh idol | गणेशमूर्ती घडविण्यात जहाँगीर यांचा हातखंडा

गणेशमूर्ती घडविण्यात जहाँगीर यांचा हातखंडा

Next

शेखर धोंगडे -- कोल्हापूर --उपजत कलाकाराला कोणतीच बंधने कशातही अडकवू शकत नाहीत. जात, पात, धर्म यांचा तर विचारच नको, याचेच एक चालते-बोलते उदाहरण म्हणजे जहाँगीर मकानदार.
कोल्हापूर येथील घोडके कॉलनीमध्ये जहाँगीर हे गणेशमूर्ती तयार करतात. ‘जी आर्टस्’ नावाने त्यांचा नावलौकिक संपूर्ण जिल्हाभर आहे. गणेशमूर्ती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारण्याबरोबरच विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू अगदी सुरेखपणाने बनविण्यामध्ये त्यांचा हातखंडा
आहे.
कलेची उपासना करणाऱ्या जहाँगीर यांनाही सुरुवातीला आपल्याच माणसांकडून विरोध झाला. मात्र, टीकेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा व झाल्या गोष्टीची कटुता मनात न ठेवता, त्यांनी कलेलाच सर्वस्वी मानले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इतर कलाकारांच्या हाताखाली शिकत, त्यांचे मार्गदर्शन घेत आणि त्याला मेहनतीची जोड देत जहाँगीर यांनी आपली कला बहरण्याचा प्रयत्न केला.
गेल्या सात वर्षांपासून ते गणेशमूर्तीसह विविध मूर्तीं बनवितात. त्यातील सुबकता, आकर्षकता, रंगसंगती यामुळे त्यांच्या मूर्र्तींना मागणी वाढत आहे. सध्या ते गणेशोत्सवानिमित्त मागणीनुसार पाच इंचापासून ते १३ फुटांपर्यंत तसेच छायाचित्रानुसार कलाकुसरीच्या
मूर्ती व प्रतिमा साकारण्यामध्ये मग्न आहेत.
कलाप्रेमी जहाँगीर जेव्हा गणेशभक्तांच्या हाती मूर्ती प्रदान करतात तेव्हा ते गणपतीचे श्लोकही म्हणतात. या कलेच्या माध्यमातून जहाँगीर यांचा नावलौकिक कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा, रत्नागिरी, सांगली, पुण्यापर्यंत पोहोचला आहे.


कोल्हापूर येथील घोडगे कॉलनीमध्ये गणेशमूर्तीला रंग देताना जहाँगीर मकानदार.

Web Title: Jahangir's handwork is to be constructed in Ganesh idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.