जान्हवी गडकरचे लायसन्स रद्द
By admin | Published: September 17, 2015 02:12 AM2015-09-17T02:12:17+5:302015-09-17T02:12:17+5:30
ईस्टर्न फ्री वे अपघातातील आरोपी जान्हवी गडकरला आरटीओकडून लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसविषयी गडकरकडून करण्यात आलेला खुलासा असमाधानकारक
मुंबई : ईस्टर्न फ्री वे अपघातातील आरोपी जान्हवी गडकरला आरटीओकडून लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसविषयी गडकरकडून करण्यात आलेला खुलासा असमाधानकारक असल्याने अखेर वडाळा आरटीओकडून जान्हवी गडकरचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
९ जूनच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास ईस्टर्न फ्री वेवरून विरुद्ध दिशेने जाताना दारूच्या नशेत असलेल्या जान्हवी गडकरच्या आॅडी कारने एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. यात दोन जणांचा मृत्यू तर तीन जण जबर जखमी झाले. जान्हवी गडकरने केलेल्या अपघाताचे स्वरूप गंभीर असल्याने लायसन्स रद्द करण्याविषयी वडाळा आरटीओकडून अपघात झाल्यानंतरच तिसऱ्या दिवशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र गडकर ही अटकेत असल्याने त्या नोटीसला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे जामीन मिळताच वडाळा आरटीओकडून दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु ही नोटीस उशिरा मिळाल्याने त्याला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी गडकरकडून करण्यात आली होती. अखेर १0 सप्टेंबर रोजी जान्हवी गडकरकडून नोटीसला उत्तर देताना न्यायालयात खटला सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे नुसत्याच एफआयआरवरून लायसन्स रद्द करण्यात येऊ नये, अशी विनंती केली. याबाबतच्या कायद्याचे ज्ञान असूनही मद्यपान करून वाहन चालवून प्राणघातक अपघातास कारणीभूत झाल्याचा वस्तुस्थितीचा विचार करून गडकर यांचा खुलासा असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच दोन इसमांच्या मृत्यूसाठी कारणीभूत आणि बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल लायसन्स रद्द करण्यात आल्याची कारवाई केल्याचे वडाळा आरटीओ अधिकारी बी. आय. अजरी यांनी सांगितले. या प्रकरणी तीन दिवसांत परिवहन आयुक्त यांच्याकडे गडकर दाद मागू शकतात, असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)