जय जवान, जय किसान धोरणाला सरकारचा हरताळ !

By admin | Published: April 26, 2017 05:39 PM2017-04-26T17:39:39+5:302017-04-26T17:39:39+5:30

शिवसेनेच्या मंत्र्यांइतके पुचाट मंत्री झाले नसल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली

Jai Jawan, Jai Kisan Policy Strike Government! | जय जवान, जय किसान धोरणाला सरकारचा हरताळ !

जय जवान, जय किसान धोरणाला सरकारचा हरताळ !

Next

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 26 - केंद्र व राज्यातील सरकारने जय जवान, जय किसान या धोरणालाच हरताळ फासला असून, राज्याच्या इतिहासात आजवर शिवसेनेच्या मंत्र्यांइतके पुचाट मंत्री झाले नसल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या मागणीसाठी निघालेल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेदरम्यान बुधवारी सकाळी सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्पूर्वी संघर्ष यात्रेतील प्रमुख नेत्यांनी दिवंगत लोकनेते व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर विखे पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू असिम आझमी आदी प्रमुख नेतेही उपस्थित होते.

याप्रसंगी विखे पाटील यांनी बुधवारच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या दोन बातम्यांचा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये झालेला नक्षलवादी हल्ला हे गुप्तचर विभागाचे अपयश असल्याची कबुली वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. काश्मीरपासून छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यापर्यंतच्या असंख्य घटना स्वयंघोषित राष्ट्रभक्त सरकारच्या कर्तबगारीची गाथा सांगण्यास पुरेशा आहेत.

दुसरीकडे राज्य सरकारने 22 एप्रिलपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे जाहीर केले. ही घोषणा तर अशी केली की, जणू ते शेतकऱ्यांवर उपकारच करत आहेत. 22 एप्रिल ही तर मुदतच होती. तोपर्यंत आलेली तूर खरेदी करणे सरकारचे कर्तव्यच आहे. पण प्रश्न 22 एप्रिलपर्यंत आलेल्या तुरीचा नाही, तर त्यानंतरही शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या हजारो क्विंटल तुरीचा आहे, याकडे लक्ष वेधून राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,  नक्षलवादी हल्ल्याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेली कबुली आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत सरकारची अनास्था पाहिली तर या सरकारने जय जवान, जय किसान या धोरणाला हरताळ फासल्याचे स्पष्ट होते. राज्यातील तूर खरेदीचा प्रश्न पेटलेला असताना मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती की, तूर खरेदीची मुदतवाढ केली जाईल. पण सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. तूर खरेदी प्रकरणी झालेल्या गोंधळासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याची माफी मागावी तर कृषि व पणन मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवेत, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

तूर खरेदीबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी असा आव आणला की, ते जणू मंत्रिमंडळाच्या बैठकीत भांडण करून तूर खरेदीची मुदत वाढवून घेणार आहेत. परंतु आपल्या खासदाराच्या विमानप्रवासासाठी संसदेत केंद्रीय मंत्र्यांच्या अंगावर धावून जाणारी शिवसेना कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांसाठी भांडायला तयार नाही. राज्याच्या इतिहासात शिवसेनेच्या मंत्र्यांइतके पुचाट मंत्री आजवरच्या कोणत्याही मंत्रिमंडळात झालेले नाहीत, असा घणाघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरही त्यांनी यावेळी तुफानी हल्लाबोल केला. शिवसेनेप्रमाणेच स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सरकारमध्ये राहून सरकारवरच टीका करण्याचा ढोंगीपणा करत आहेत. या ढोंगीपणात उद्धव ठाकरे बडे मियाँ असतील तर खा. राजू शेट्टी छोटे मियाँ आहेत. खा. राजू शेट्टींनी आपल्या संघटनेच्या नावातून स्वाभिमानी हा शब्द काढून टाकला पाहिजे. त्यांच्या कथनीला आणि करणीला स्वाभिमानी हा शब्द शोभत नाही, या भाषेत विखे पाटील यांनी खा. राजू शेट्टींचा समाचार घेतला.

कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरही त्यांनी अनेक प्रहार केले. मंत्रिमंडळात जाऊन सदाभाऊ खोतांना भाजपच्या इव्हेंट मॅनेजमेंटची लागण झाली आहे. मध्यंतरी त्यांनी आठवडी बाजार भरवून भाजी विकण्याचा स्टंट केला. पण वर्तमानपत्रांमधून बातम्या छापून आल्यानंतर खोत आठवडी बाजारांनाही विसरले अन् शेतकऱ्यांनाही विसरले. जनता ज्या वेगाने डोक्यावर घेते, दुप्पट वेगाने खाली आपटते, हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ध्यानात ठेवावे, असा सूचक इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा आणखी एक सनदशीर प्रयत्न म्हणून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या मागणीसाठी ग्रामसभेत ठराव करून ते सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन देखील विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केले. दरम्यान, बुधवारी दुपारपर्यंत संघर्ष यात्रेच्या कवठेमहांकाळ, तासगाव येथे जाहीर सभा झाल्या. सांगलीवरून निघाल्यानंतर अनेक ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले व कर्जमाफीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कवठेमहांकाळ येथे सर्व प्रमुख नेत्यांची बैलगाडीतून मिरवणूक निघाली. 

Web Title: Jai Jawan, Jai Kisan Policy Strike Government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.