जय विदर्भावरुन शिवसेनेसमोर भाजपाचे नमते
By admin | Published: November 11, 2014 02:23 PM2014-11-11T14:23:12+5:302014-11-11T16:47:55+5:30
विधानसभेत जय विदर्भ अशा घोषणाबाजी करणा-या भाजपा आमदारांव शिवसेनेने मंगळवारी जोरदार आक्षेप घेतला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - विधानसभेत जय विदर्भ अशा घोषणाबाजी करणा-या भाजपा आमदारांवर शिवसेनेने मंगळवारी जोरदार आक्षेप घेतला. अखेरीस विधानसभेचे हंगामी अध्यक्ष जिवा गावित यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारे वक्तव्य सभागृहात नको असा आदेश दिला.
विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुस-या दिवशी भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सुरु असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी १२ ऐवजी दुपारी दुपारी ३ पर्यंत मुदतवाढ द्यावी असे शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांचे म्हणणे होते. यानंतर शिवसेना आमदारांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिवसेना आमदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना आमदारांनी विरोध सुरुच ठेवला. अखेरीस विधानसभा अध्यक्षांनी अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी तीनपर्यंत वाढवली व त्यानंतर विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाले.
नवनियुक्त भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी शपथ घेतल्यावर जय विदर्भ असा नारा दिला. यावरही शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला. अशा घोषणेमुळे महाराष्ट्राचा अपमान होत असल्याचे शिवसेना आमदारांनी सांगितले. अखेरीस हंगामी अध्यक्ष गावित यांनी आमदारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारे विधान करु नये असे आदेश दिले.
---------------
विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत
विधानसभा अध्यक्षपदासाठी तिंरगी लढत होणार असून भाजपातर्फे हरिभाऊ गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड आणि शिवसेनेतर्फे विजय औटी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.