‘जय महाराष्ट्र’:मुंबई-बेळगाव एसटी धावली
By admin | Published: June 3, 2017 04:09 AM2017-06-03T04:09:27+5:302017-06-03T04:09:27+5:30
एसटीच्या नवीन बोधचिन्हासह ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्याचा समावेश असलेली ‘मुंबई-बेळगाव’ ही पहिली एसटी शुक्रवारी सकाळी बेळगावच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटीच्या नवीन बोधचिन्हासह ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्याचा समावेश असलेली ‘मुंबई-बेळगाव’ ही पहिली एसटी शुक्रवारी सकाळी बेळगावच्या दिशेने रवाना झाली. एसटीचे नियोजन व पणन विभागाचे महाव्यवस्थापक कॅप्टन विनोद रत्नपारखी यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवला.
मुंबई सेंट्रल आगार येथून मुंबई-बेळगाव ही एसटी सकाळी ७.३० वाजता मार्गस्थ करण्यात आली. यावेळी रत्नपारखी यांच्यासह कामगार प्रतिनिधी श्रीरंग बरगे हेदेखील उपस्थित होते. मुंबई-बेळगाव एसटीचे पुणे-सातारा-कराड येथे स्वागत होणार असल्याची माहिती एसटीच्या वतीने देण्यात आली.
कर्नाटक येथील मंत्र्यांनी ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्यामुळे वादंग निर्माण केला होता. यावर परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटीच्या सर्व बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याचे आदेश दिले. त्यानुसार, एसटीच्या ६९व्या वर्धापन दिनी एसटीच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या बोधचिन्हात जय महाराष्ट्रचा समावेश करण्यात आला आहे. नवीन बोधचिन्हासह पहिली बस मुंबई-बेळगाव या मार्गावर मार्गस्थ करण्यात आली. लवकरच एसटी ताफ्यातील सर्व बसवर नवीन बोधचिन्ह लावण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.