मुंबापुरीत ‘जय श्रीराम’चा जयघोष
By admin | Published: April 5, 2017 02:22 AM2017-04-05T02:22:23+5:302017-04-05T02:22:23+5:30
शहरासह उपनगरात निघालेल्या रथयात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे रामनवमी उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.
मुंबई : रामनवमी उत्सवानिमित्त मंगळवारी मुंबापुरीत चहूबाजूूंना ‘जय श्रीराम’चा जयघोष होता. शहरासह उपनगरात निघालेल्या रथयात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे रामनवमी उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.
मुंबईतील सर्वच राम मंदिरांत दुपारी एक वाजता राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. दादर येथील कात्रक रोडहून दादर टीटी-खोदादाद सर्कलमार्गे वडाळा येथील श्रीराम मंदिरपर्यंत मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. श्रीरामाची पूजा, रथपूजा, महामंगला आरती, पालखी पूजा, समराधना, ब्रह्मार्थ उत्सवासह डाळ-भात व केशरी भाताच्या विशेष प्रसादाने उत्सवाची रंगत वाढली.
या ठिकाणी राम मंदिरासमोरील हनुमान मंदिरातही भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. रथोत्सवादरम्यान भाविकांसाठी अन्नदान सोहळ्याचे आयोजन केले होते. सुमारे ६५ वर्षांची परंपरा असलेल्या या राम मंदिरात आज एक लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे विश्वस्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>एकाच ठिकाणी
१५० मूर्तींचे दर्शन
बोरीवली पश्चिमेकडील बाभई गावातील चोगले कुटुंबीयांच्या पुरातन राम मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. श्रीरामासह, हनुमान, विठ्ठल, श्रीकृष्ण अशा विविध देवतांच्या सुमारे १५० देवतांच्या मूर्ती या मंदिरात आहेत. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी आवर्जून गर्दी केली़
उशिरापर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले
चर्नी रोडमधील ठाकूरद्वार परिसरात असलेले झावबा श्रीराम मंदिर रामनवमी उत्सवानिमित्त सुगंधी फुलांसह आकर्षक रोषणाईने सजले होते. पुरातत्त्व विभागाच्या यादीतील या मंदिरात उत्सवाची सुरुवात सकाळी कीर्तनाने झाली. दुपारी भजनासह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
काळ्या दगडातील ‘श्रीराम’
गिरगावच्या वैद्यवाडीमधील १९० वर्षे जुन्या असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये सोमवारपासून दर्शनासाठी लगबग दिसून आली. या मंदिरातील काळ्या दगडापासून साकारण्यात आलेल्या श्रीराम, सीता, भरत, शत्रुघ्न या देवतांच्या विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी तुडुंब गर्दी केली होती. सकाळच्या आरतीनंतर दुपारी कीर्तन पार पडले.
‘हरे रामा, हरे कृष्णा’चा गजर
रामनवमीनिमित्त जुहू येथील इस्कॉन, श्री राधा रासबिहारी मंदिरात पहाटे साडेचार वाजल्यापासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली. ‘हरे राम हरे कृष्ण’च्या जयघोषात भगवान श्रीरामांना महाभिषेक, महाभोग अर्पण करून महाआरती घेण्यात आली. या वेळी बॉलीवूडमधील नामांकित मंडळींनीही या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती.