सांगलीमध्ये सर्वपक्षीय समितीचे जेलभरो, 200 कार्यकर्ते ताब्यात
By admin | Published: June 8, 2017 02:25 PM2017-06-08T14:25:32+5:302017-06-08T14:25:32+5:30
राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी कृती समितीच्यावतीने गुरुवारी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलन केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 8 - राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी कृती समितीच्यावतीने गुरुवारी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलन केले. आंदोलकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. त्यानंतर पोलिसांनी दोनशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व काही वेळात त्यांना सोडूनही दिले.
राज्यातील शेतक-यांच्या संपाचा गुरुवारी आठवा दिवस. सांगली जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन शेतकरी कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून गेल्या सात दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. गुरुवारी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले होते. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ समितीचे कार्यकर्ते जमा झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांच्या निषेध करुन निदर्शने करण्यात आली. शासनाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तेथून सर्व कार्यकर्ते चालत शेजारीच असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या आवारात गेले. पोलिस ठाण्यात कार्यकर्ते घुसू नयेत, यासाठी पोलिसांनी त्यांना ठाण्याच्या प्रवेशद्वाजवळ रोखून धरले. तेथेही शेतक-यांना कर्जमाफी दिली पाहिजे, अशी घोषणाबाजी झाली.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. शिष्टमंडळाने बोराटे यांना निवेदन दिले. जोपर्यंत सरसकट शेतक-यांना कर्जमाफी दिली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनात किसान सभेचे कॉ. उमेश देशमुख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मनसेचे अमर पडळकर, जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे, कॉ. शंकर पुजारी, कॉ. सुमन पुजारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, अवामि विकास पार्टीचे अशरफ वांकर, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, हिंद मजदूर सभेचे विकास मगदूम, सतीश साखळकर, शेतकरी संघटनेचे अशोक माने, नगरसेवक बाळासाहेब काकडे, शेडजी मोहिते, संतोष पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, हरिदास पाटील, पद्माकर जगदाळे, असिफ बावा आदी सहभागी होते.
कडकोट बंदोबस्त
कारवाईची कोणतीही नोटीस न देता बुधवारी कॉ. उमेश देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, अॅड. अमित शिंदे, अॅड. सुधीर गावडे यांच्यासह आठजणांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याने प्रकरण चिघळले होते. पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. त्यामुळे गुरुवारच्या जेलभरो आंदोलनात असा प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.