धनगर आरक्षणासाठी ‘जेल भरो’
By admin | Published: August 1, 2016 11:09 PM2016-08-01T23:09:58+5:302016-08-01T23:09:58+5:30
राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले देण्याची मागणी करत ‘जेल भरो’ आंदोलन केले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले देण्याची मागणी करत ‘जेल भरो’ आंदोलन केले. आरक्षणासाठी विधानसभेत शिरकाव करण्याचा प्रयत्न
करणा-या कार्यकर्त्यांना आझाद मैदान आणि मरिन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले.
संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले की, धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यास सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत, असा कायदा असून त्याचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. तरी यासंदर्भात सर्व्हेक्षण करण्यासाठी निवडलेल्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स (टीस) या संस्थेची निवड रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाची भेट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झाली. पाटील यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत अनुसूचित जमातीचे दाखले देण्यासंदर्भातील पुरावे सादर करण्याचे आवाहन केले.
त्यानंतरच टीसची निवड रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. धनगर समाजाला अनुसूचीत जमातीमध्ये आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून अधिवेशन संपल्यानंतर चार दिवसांत बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केले आहे, अशी माहिती हेमंत पाटील यांनी दिली.