जेलभरो आंदोलनाचा निर्णय
By admin | Published: December 2, 2014 10:58 PM2014-12-02T22:58:40+5:302014-12-02T23:35:37+5:30
मालवणात पारंपरिक मच्छिमारांची बैठक : निवती समुद्रातील वादाला रूद्र स्वरूप
मालवण : निवती येथे सोमवारी पारंपरिक विरूद्ध पर्ससीन नेटधारक मच्छिमारांमध्ये झालेल्या संघर्षानंतर मंगळवारी निवती पोलीस स्थानकात १३ पारंपरिक मच्छिमारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा निषेध म्हणून मंगळवारी सायंकाळी दांडी समुद्रकिनाऱ्यावर पारंपरिक मच्छिमारांची बैठक झाली. या बैठकीत बुधवारी जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला मालवण, तोंडवळी, तळाशिल, देवबाग, धुरीवाडा आदी किनारपट्टीवरील सुमारे २५० ते ३०० मच्छिमार महिला-पुरूष उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ‘मच्छिमार एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.
मच्छिमार नेते विकी तोरसकर म्हणाले, हा प्रश्न केवळ मालवण किंवा देवबाग किनारपट्टीवरील मच्छिमारांचा राहिलेला नसून सातपाटी ते रेडीपर्यंतच्या ७२१ किलोमीटरपर्यंत पसरलेल्या सर्वच पारंपरिक मच्छिमारांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. या आंदोलनाची तुलना शेतकरी आंदोलनाशीच होऊ शकते. देव चौकचाराची ताकद आपल्या मागे उभी आहे. पारंपरिक मच्छिमारांकडे शासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केले असले तरीही त्यांच्याकडे मासेमारीसाठी वापरले जाणारे ‘टांगूल’, मतपेटी व लेखणी ही प्रभावी तीन हत्यारे आहेत. या हत्यारांपैकी कोणतेही हत्यार मच्छिमार वापरू शकतो, हे शासनकर्त्यांनी लक्षात ठेवावे.
भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनीही यावेळी पारंपरिक मच्छिमारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, फिशरीजचे कायदे नियम हे तकलादू स्वरूपाचे आहेत. मिनी पर्ससीनधारक हे कायदेकानून मानत नाहीत. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. शिवसेना नगरसेविका सेजल परब म्हणाल्या, आज पारंपरिक मच्छिमारांपैकी १३ जणांवर गुन्हे दाखल झाले असले तरीही संपूर्ण मच्छिमार समाज या १३ जणांच्या पाठीशी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक मच्छिमार प्रतिनिधी म्हणून मी या लढ्यात सामील असल्याचेही त्या म्हणाल्या.
या बैठकीत निवतीमधील संघर्षात १३ जणांवर गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी मासळी मार्केट बंद ठेवण्यात यावे, अशी सूचना उपस्थित मच्छिमार महिलांमधून करण्यात आली. यावेळी बुधवारी सकाळी ९.३० वाजता दांडी चौकचार मंदिर येथे शेकडोंच्या संख्येने जमून देवाला नारळ ठेवून मालवण पोलीस ठाणे गाठण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
पाठींबा जाहीर
पारंपरिक मच्छिमारांच्या आंदोलनाला शिवसेना आमदार वैभव नाईक व भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दांडी येथे उपस्थित राहत पाठींबा दर्शवला. आमदार नाईक म्हणाले, पारंपरिक मच्छिमारांचा पर्ससीनविरोधात अनेक वर्षे लढा सुरू आहे. शासनाने या लढ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच संघर्षाला सुरूवात झाली आहे. पारंपरिक मच्छिमारांच्या प्रश्नांसाठी आम्ही सत्तेत असो वा नसो त्यांच्यासोबतच राहणार आहे. मात्र मच्छिमारांनी शांततेच्या मार्गाचा अवलंब करावा, असे नाईक म्हणाले.
‘त्या’ संघर्षाला फिशरीज
खाते जबाबदार : काळसेकर
मालवण : निवतीच्या समुद्रात पारंपरिक मच्छिमार आणि मिनी पर्ससीनधारक यांच्यात जो संघर्ष घडला त्याला फिशरीज खातेच जबाबदार आहे. आव्हाने-प्रतिआव्हाने ज्यावेळी दिली गेली त्यावेळी या खात्याने पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली असती तर सोमवारचा प्रकार घडला नसता. त्यामुळे मिनी पर्ससीनधारकांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका घेत भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी मालवणच्या मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
निवती येथील समुद्रात पारंपरिक मच्छिमार आणि मिनी पर्ससीन मच्छिमार सोमवारी एकमेकाला भिडले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी अतुल काळसेकर यांनी मालवणला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी मालवणच्या मत्स्य कार्यालयाला भेट देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांच्यासमवेत विलास हडकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, भाऊ सामंत, दादा वाघ, अनिल मोंडकर, राजू आंबेरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. काळसेकर म्हणाले, २०० ते २५० अनधिकृत मिनी पर्ससीनधारक असून गेले चार- पाच दिवस पारंपरिक मच्छिमारांसोबत त्यांचा वाद सुरू आहे. असे असतानाही अधिकाऱ्यांनी मिनी पर्ससीनधारकांवर का कारवाई केली नाही? संघर्षाअगोदरच या प्रश्नाबाबत तोडगा काढला असता तर सोमवारी घडलेला प्रकार झाला नसता. अधिकाऱ्यांच्या बेफिकीरीमुळेच हा संघर्ष घडला आहे. अनधिकृत मिनी पर्ससीन बोटींमुळे पारंपरिक मच्छिमारांबरोबरच देशाच्या सुरक्षिततेलाही धोका आहे. त्यामुळे अनधिकृत पर्ससीन बोटींवर कारवाई झालीच पाहिजे. अनधिकृत पर्ससीन बोटींचा अहवाल बनवून तो पोलिसांकडे पाठवा. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस संरक्षण मागवून अनधिकृत पर्ससीनवर गुन्हे दाखल करा.
जखमी मोर्जे यांची भेट
निवती येथील समुद्रात झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या भाऊ मोर्जे या पारंपरिक मच्छिमाराची अतुल काळसेकर यांनी भेट घेऊन कुटुंबीयांना धीर दिला. (प्रतिनिधी)
अधिकारी अनुपस्थित
मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकारी सुगंधा चव्हाण यांनी मिनी पर्ससीनवर कारवाई सुरूच असल्याचे यावेळी सांगितले. तर पारंपरिक व पर्ससीन मच्छिमारांमध्ये संघर्ष उद्भवण्याची शक्यता असल्याने सागरी किनारपट्टीवरील तिन्ही तालुक्यांतील आपल्या अधिकाऱ्यांना त्याबाबत कल्पना दिली होती. तसेच अधिकाऱ्यांनी समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित रहावे, अशा सूचना दिल्या होत्या, असे सांगितले. मात्र, ज्यावेळी संघर्ष झाला त्यावेळी अधिकारी अनुपस्थित असल्याने सुगंधा चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाचे पदाधिकारी अवाक् झाले.