बाळाच्या नशिबी आले कारागृह!
By admin | Published: January 1, 2015 02:35 AM2015-01-01T02:35:01+5:302015-01-01T15:49:29+5:30
कुठलाही गुन्हा नसताना या शिक्षेचा भागिदार होण्याची वेळ आलीय ती एका निरागस निष्पाप नऊ महिन्यांच्या चिमुरड्यावर !
शिक्षा भोगणारी आजी करतेय संगोपन : सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी शिक्षा
नीलेश शहाकार- बुलडाणा
आईने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली... वडील अपंग आणि आजोबा दृष्टीहीन, आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात आजी शिक्षा भोगतेय. अशा विपरीत परिस्थितीत कुठलाही गुन्हा नसताना या शिक्षेचा भागिदार होण्याची वेळ आलीय ती एका निरागस निष्पाप नऊ महिन्यांच्या चिमुरड्यावर !
संवेदनशील माणसाच्या हदयाला पाझर फोडणारे हे वास्तव आहे, बुलडाणा जिल्हा कारागृहातील. जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कनकखुर्द येथील प्रमिला वसंत जाधवने मुलाच्या लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात सुनेचा हुंड्यासाठी छळ सुरु केला. या छळाला कंटाळून या बाळाचाही विचार न करता विवाहितेने आत्महत्या केली. तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने सुनेचा छळ आणि हत्येस कारणातून ठरवून आजी प्रमिला जाधवसह कुटूंबातील चार सदस्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली व १२ डिसेंबर २०१४ ला कारागृहात रवानगी केली. अपंग वडील व दृष्टीहीन आजोबा नऊ महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करण्यास असमर्थ असल्याने त्याला सांभाळण्याची जबाबदारी आजीवर आली.
च्आजीसोबत दुधाचे ओठही न सुकलेल्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने कारागृहातील दगडी भिंतीनाही मायेचा पाझर फोडला आहे. कर्तव्यकठोर पण माणुसकीच्या नात्याने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्या बाळाच्या आरोग्याची काळजी सतत सतावत असते. कारागृहातील नियम पाळतानाच दर पाच दिवसांनी बाळाची आरोग्य तपासणी व आवश्यक ती औषधी त्याला दिली जाते.
नऊ महिन्यांच्या बाळासाठी कपडे व खेळणी पुरविले जातात. शिवाय या चिमुकल्याशी सर्वांचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. शेवटी कर्तव्यासमोर काही गोष्टी बाजूला ठेवाव्याच लागतात आणि नियम व कायद्याचे पालनही करावे लागते.
— आशिष गोसावी,
कारागृह पोलीस अधीक्षक बुलडाणा.