सामाजिक कार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे- मुख्यमंत्री

By admin | Published: July 2, 2017 06:32 PM2017-07-02T18:32:03+5:302017-07-02T18:32:03+5:30

जैन समाजाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सामाजिक कार्यातही जैन समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे

Jain community contribution in social work - Chief Minister | सामाजिक कार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे- मुख्यमंत्री

सामाजिक कार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे- मुख्यमंत्री

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - जैन समाजाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सामाजिक कार्यातही जैन समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जैन धर्माचे विचार त्या समाजातील वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. यापद्धतीने पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली "सबका साथ, सबका विकास" हाच नारा घेऊन आम्ही काम करीत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जैन समाज बांधवांच्या वतीने आयोजित जैन इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन (जिओ) "मेगा बिझनेस जिओ कॉन्फरन्स"मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, अभिनेता जॅकी श्रॉफ, आमदार ॲड. आशिष शेलार, परमपूज्य नया पद्मसागर महाराज, चित्रपट निर्माते आनंद रॉय, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अंजली विजय रूपानी आदींसह देशातील विविध ठिकाणी कार्यरत असणारे जैन बांधव उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शतकानुशतके आपण अनेक कथा ऐकत आलो आहोत, त्यानुसार जेव्हा पुण्य एकत्र येते तिथे सर्व जण नतमस्तक होतात. अशा प्रकारे आदरणीय नया पद्मसागर महाराज यांचे जैन समाजासाठीचे कार्य खूप मोठे असल्याने त्यांच्यापुढे सर्वजण नतमस्तक होतात. जैन समाजापर्यंत विचार पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत नाही. या समाजाने व्यापारी जगतात आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे देशाच्या विकासातील त्यांचे योगदान आपल्याला ठळकपणे जाणवणारे आहे. जैन समाजाने 17 हजार गावांत जलसाक्षरतेचे काम केले आहे, ते खरंच उल्लेखनीय आहे. आदरणीय नया पद्मसागर महाराज यांच्या प्रेरणादायी विचारातून या कामाला गती मिळाली. गुजरात सरकारप्रमाणे आम्हीही गोरक्षण करणे महत्वाचे मानतो. कारण ज्याठिकाणी गो-रक्षा केली जात नाही तो प्रदेश, तिथे असणारी जमिनीची सुपीकता कमी होते असे आढळून आले आहे. आपली घटना देखील दुधाळ पशूंचे संवर्धन करावे असे सांगते. गोरक्षण फक्त धार्मिक गोष्टीशी निगडीत नाही, आपले अनेक धर्मातील सिद्धांत विज्ञानाशी जोडले गेले आहेत. नुकताच देशात जीएसटी कायदा लागू झाला असून, एक देश एक कर यामुळे विकासाला चालना मिळेल. जीएसटीच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक वाढून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यातून देशाचा जीडीपी 4 टक्के वाढण्यास मदत होणार आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री मेघवाल म्हणाले, जीएसटीचा सर्वसामान्यांसह सर्वांनाच फायदा होणार आहे. या कायद्याचे आपण सर्वांनी पालन करूया. सर्वसामान्य माणसाचे आयुष्य आनंदी व्हावे, हाच यामागचा हेतू आहे, जीएसटी आपले भविष्य आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री रूपानी म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून गुणवत्ता आणि अविरत सेवेचे व्रत आम्ही अंगीकारले आहे. मुख्यमंत्री हे पद नसून ती एक जबाबदारी आहे. या पदामुळे मिळालेली प्रतिष्ठा नसून ती परीक्षा आहे. विकासाच्या प्रवाहात शेवटच्या घटकाला सामावून घेण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्नशील आहोत. जगा आणि जगू द्या हे जैन समाजाचे तत्वज्ञान आम्ही आमच्या कार्यातूनही करीत आहोत. गुजरातमध्ये गोरक्षेसाठी कायदा कडक केला आहे. पतंग महोत्सवामध्ये पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी करुणा अभियान राबविले. याप्रमाणेच स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवित आहोत.
यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जिओ भामा पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. जिओ भामा पुरस्काराने निर्मल सेठयाजी, अभय श्रीराम, कांतीलाल राम बिहार, नवनीत परिवारचे बाबूलाल बिहार, नरेशभाई, श्रुतीभाई आदींचा सन्मान करण्यात आला. जैन समाजाच्या वतीने महिला साध्वींच्या श्रमणी विहारम यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. जिओ टीमची यावेळी घोषणा करण्यात आली.

Web Title: Jain community contribution in social work - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.