जैन समाजाने संघटित होण्याची गरज - नयपद्मसागर महाराज, विजय दर्डा, अमरीश पटेल यांच्यासह मान्यवरांचा सन्मान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 05:19 AM2017-09-11T05:19:45+5:302017-09-11T05:20:04+5:30

Jain community needs to be organized - Nayappadasagar Maharaj, Vijay Darda, Amrish Patel, honors dignitaries | जैन समाजाने संघटित होण्याची गरज - नयपद्मसागर महाराज, विजय दर्डा, अमरीश पटेल यांच्यासह मान्यवरांचा सन्मान  

जैन समाजाने संघटित होण्याची गरज - नयपद्मसागर महाराज, विजय दर्डा, अमरीश पटेल यांच्यासह मान्यवरांचा सन्मान  

Next

मुंबई : शांतता आणि अहिंसेच्या माध्यमातून जैन समाजाने विश्वाला जीवन जगण्याची शिकवण दिली. सामाजिक बांधिलकी जपणारा जैन समाज भूकंप व इतर आपत्तींंच्या प्रसंगी मदतीसाठी सर्वांत पुढे असतो. संघटन शक्तीच्या जोरावरच समाजातील सज्जन लोक दुष्ट प्रवृत्तींचा सामना करू शकतात. त्यामुळे जैन समाजाने संघटित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नयपद्मसागर महाराज यांनी केले.
जुहू येथील ‘ट्युलिप स्टार हॉटेल’मध्ये ‘जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन’ (जिओ) या संस्थेच्या सांताक्रूझ, विलेपार्ले, जुहू, अंधेरी, वर्सोवा आणि गोरेगाव येथील विविध शाखांचे उद्घाटन आणि शपथग्रहण कार्यक्रमात नयपद्मसागर महाराज बोलत होते. या वेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, शिक्षण महर्षी व माजी शिक्षणमंत्री अमरीश पटेल, युनियन बँकेचे चेअरमन केवल हुंडा, आयएएस अधिकारी पराग जैन, प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे, आमदार अमित साटम, आमदार भारती लव्हेकर, ट्युलिप स्टार हॉटेलचे मालक अजित केरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या वेळी नयपद्मसागर महाराजांच्या हस्ते विजय दर्डा, अमरीश पटेल, अजित केरकर यांचा पगडी, सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, पराग जैन, केवल हुंडा यांचाही सत्कार झाला.
विश्वात ‘जिओ’चा विस्तार करा, जैन युवाशक्ती वाढवा, असे आवाहन करत नयपद्मसागर महाराज म्हणाले की, आपत्तीच्या प्रसंगात सर्वांत पुढे असणाºया जैन समाजाच्या शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, कम्युनिटी हॉल नाहीत. प्रशासकीय सेवेत, न्यायदानात, तसेच राजकीय क्षेत्रात जैन समाजातील लोकांची संख्या कमी आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. जैन समाजातील नवीन पिढीला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे उघडायला हवीत. प्रशासकीय सेवांचे प्रशिक्षण वर्ग तसेच दर तीन वर्षांत किमान एक शाळा-महाविद्यालय उभारण्याचा संकल्प करा, असे आवाहन नयपद्मसागर महाराज यांनी उपस्थित जैन बांधवांना केले. जैन बांधव म्हणजे व्यापार हे समीकरण असले तरी आता जैन बांधवांनी राजकारणात पुढे आले पाहिजे. नगरसेवक, आमदारकीच्या निवडणुकीत जो पक्ष जैन बांधवांना संधी देईल त्यांच्या पाठीमागे उभे राहा. अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढविण्यास सज्ज राहा. भविष्यात राज्यात आपले २०० नगरसेवक आणि ६५ आमदार निवडून आले पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.
‘जिओ’ संघटनेचा कार्यभार सांभाळणारे मनिष शाह यांचा गौरव करून नयपद्मसागर म्हणाले की, ९२४३०३७६०३ या क्रमांकावर मिस कॉल दिला की ‘जिओ’च्या विविध योजना आणि उपक्रमांंची माहिती मिळेल. ‘जिओ’च्या सदस्यांना पंतप्रधानांच्या स्टार्ट अप योजनेतून एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज संघटना उपलब्ध करून देणार आहे. तसेच संस्थेतर्फे रोजगार प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. किरीट भन्साली यांच्या कार्याचाही नयपद्मसागर महाराज यांनी गौरव केला.
या वेळी विजय दर्डा म्हणाले की, १९९४ साली मी ‘सकल जैन समाज’ या मंचाची स्थापना केली होती. जैन समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर काँग्रेसच्या अधिवेशनात या मागणीचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. तेव्हा राहुल गांधी यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगून हा प्रश्न तत्काळ सोडविला, हे विसरून चालणार नाही. जैन समाजातील मुला-मुलींनी आयएएस, आयपीएस, आयएफएस, विधि सेवांमध्येही प्रवेश करावा, यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले, त्यालाही आता चांगले यश मिळत आहे.
नयपद्मसागर महाराज यांच्यात जैन समाजाला एकत्र आणण्याची अद्भुत शक्ती असल्याचेही विजय दर्डा यांनी नमूद केले.
याप्रसंगी अमरीश पटेल म्हणाले की, आपण शाळा-कॉलेजच्या कामांमध्ये लक्ष द्यायला हवे. मुख्यमंत्र्यांना आपण ही बाब पटवून द्या. सध्याच्या काळात गरीब विद्यार्थ्यांची प्रतारणा होत आहे. वसतिगृहांची सुविधा गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे आता जैन समाजाने वसतिगृहांच्या उभारणीवर जोर द्यायला हवा. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह नाही, ही वस्तुस्थिती असल्याचेही पटेल यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
नयपद्मसागर महाराज यांना माझे नाव माहीत आहे, हीच मोठी गोष्ट असल्याचे प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे याने नमूद केले.

मीरा-भार्इंदरमध्ये एकजुटीचा विजय
मीरा-भार्इंदरच्या महापालिका निवडणुकीत झालेला विजय हा जैन समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याचे उद्गार नयपद्मसागर महाराज यांनी या कार्यक्रमात काढले. मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीनंतर सेनेने
जैन मुनींवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर समाज संघटित असल्याने झालेला हा विजय म्हणजे एकजुटीचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद करत नयपद्मसागर महाराज यांनी नाव न घेता शिवसेनेला टोला हाणला.

Web Title: Jain community needs to be organized - Nayappadasagar Maharaj, Vijay Darda, Amrish Patel, honors dignitaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई