जैन तत्त्वज्ञान केंद्र जगात सर्वोत्कृष्ट ठरेल
By admin | Published: July 20, 2015 01:08 AM2015-07-20T01:08:19+5:302015-07-20T01:08:19+5:30
उच्चशिक्षणाची व्यवस्था नसताना कचनेर (ता. औरंगाबाद) येथे जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राला विद्यापीठाची मंजुरी मिळाली आहे.
कचनेर (जि. औरंगाबाद) : उच्चशिक्षणाची व्यवस्था नसताना कचनेर (ता. औरंगाबाद) येथे जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राला विद्यापीठाची मंजुरी मिळाली आहे. मात्र केंद्रातील पायाभूत सुविधा व गं्रथसंपदेमुळे ते जगातील सर्वोत्कृष्ट केंद्र होईल, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी येथे व्यक्त केला.
श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर ट्रस्टअंतर्गत विद्यापीठ मान्यताप्राप्त जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राचे चोपडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. चोपडे म्हणाले की, इतिहासात मानव जातीच्या विकासासाठी भगवान महावीर व भगवान बुद्धांचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. या केंद्राद्वारे मानवाच्या विकासाबाबत उत्कृष्ट संशोधन व्हावे.
जैन तत्त्वज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे मानले जाते. केंद्राच्या माध्यमातून येथे आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन जैन तत्त्वज्ञानाचा जगभर प्रचार व प्रसार करण्यात मदत होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष व पुणे विभागाचे विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काले म्हणाले की, जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जैन तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे.