रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या जैन साधू-साध्वींना नमन
By Admin | Published: May 23, 2017 03:20 AM2017-05-23T03:20:05+5:302017-05-23T03:20:05+5:30
दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याचेही धाडस कुणीच करत नाही, मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिले. मात्र जैन साधू-साध्वी याला अपवाद आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याचेही धाडस कुणीच करत नाही, मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिले. मात्र जैन साधू-साध्वी याला अपवाद आहेत. सूर्य कितीही आग ओकत असला, तरीही ते रोज अनवाणी पायाने बाहेर पडतात. या त्यांच्या सहनशीलतेला सर्वच जण नमन करतात.
कडक उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असली, तरी यामुळे जैन साधू-साध्वींच्या दिनचर्येत कोणताही फरक पडत नाही. आपण एसी खोलीमध्ये बसून वाढलेल्या तापमानाबाबत रडगाणे गात असतो, पण जैन साधू-साध्वींची दिनचर्या नेहमीसारखीच असते.
ते दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये गोचरी-भिक्षाचर्या करण्यासाठी अनवाणी बाहेर पडतात. त्यांना पाहून लोकांना प्रचंड आश्चर्य वाटते. एवढ्या कडक उन्हात व तापलेल्या रस्त्यांवर ते कसे चालत असतील, असा प्रश्न पडून सर्वांच्याच माना श्रद्धेने झुकतात.
जैन साधू-साध्वी भगवान महावीर स्वामी यांच्या मार्गावर चालत आहेत. त्यांना बाहेर संचार करताना कष्ट होऊ नये, हीच प्रार्थना भाविक करतात. त्यांच्यावर देवाची कृपादृष्टी सतत राहो. अनेक भाविक भगवान महावीर यांचा मार्ग आत्मसात करण्यासाठी जैन साधू-साध्वींसोबत चालायला लागतात.