भाजपाचं लोकसभेतलं संख्याबळ घटण्याची शक्यता; महाराष्ट्रातल्या एका सदस्याची खासदारकी जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:54 AM2020-02-25T03:54:24+5:302020-02-25T06:52:10+5:30
लोकसभा निवडणुकीवेळी जयसिद्धेश्वर यांच्या जातप्रमाणपत्रावर उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता.
सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बेडा जंगम जातीचा दावा अमान्य करून या जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सोमवारी अवैध ठरविले. या जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या खासदार जयसिद्धेश्वर, अक्कलकोट तसेच फसली उताºयाची बनावट नोंद करून देणाऱ्या उमरगा तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात तत्काळ लेखी फिर्याद दाखल करावी, असे निर्देश समितीने दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी जयसिद्धेश्वर यांच्या जात प्रमाणपत्रावर उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळल्यानंतर प्रमोद गायकवाड, विनायक कंदकुरे आणि मिलिंद मुळे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती.
जयसिद्धेश्वर यांनी मूळ नावात बदल करून जात बदलली. त्यांची जात लिंगायत असताना खोट्या माहितीच्या आधारे बेडा जंगम जातीचा बनावट व बोगस दाखला तयार केला, असे तक्रारीत म्हटले होते. पडताळणी समितीने तक्रारदार व खासदारांनी सादर केलेले पुरावे तपासण्यासाठी दहा सुनावण्या घेतल्या. दक्षता पथकाने २६ नोव्हेंबर २०१९ रोजी चौकशी अहवाल सादर केला. समितीने ३१ डिसेंबर रोजी दक्षता पथकाच्या अहवालासह बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र रद्द का ठरविण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावून लेखी खुलासा मागविला होता.
जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेल्या या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांचे वकील संतोष न्हावकर यांनी सांगितले.
शेतीचे उतारे नवीन पुरावे
मोडी लिपीतील उताऱ्याची पडताळणी समितीने केली. खासदार महास्वामी यांनी समितीकडे १९ पुरावे सादर केले. दाखल केलेले फसल उतारेही अशाच प्रकारे संशयास्पद असल्याचे समितीने नमूद केले.