जयस्वाल हत्या पैशांसाठी ?
By admin | Published: December 22, 2014 05:03 AM2014-12-22T05:03:14+5:302014-12-22T05:03:14+5:30
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांच्या मारेकऱ्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे
नवी मुंबई : बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांच्या मारेकऱ्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यांची हत्या आर्थिक व्यवहारातून घडवून आणल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
खारघर येथे राहणाऱ्या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्ष मीनाक्षी जयस्वाल यांची शुक्रवारी भरदिवसा राहत्या घरी हत्या झाली. घटनेनंतर पोलिसांनी काहीच तासांतच दोघांना अटक देखील केली आहे. विनायक चव्हाण आणि मनिंदरसिंग बाजवा अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
चव्हाण हा जयस्वाल कुटुंबीयांच्या परिचयाचा होत्या. त्यांनीच हत्या घडवून आणल्याचा संशय व्यक्त होत आहे. मीनाक्षी जयस्वाल यांच्याकडून चव्हाण याने उसने पैसे घेतले होते. ही रक्कम मोठी असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यापैकी काही रकमेची त्याने परतफेड केली होती. मात्र उर्वरित रक्कम देखील लवकर परत देण्याची मागणी जयस्वाल चव्हाण याच्याकडे करत होत्या. याच रागातून चव्हाण याने मनिंदरसिंग बाजवा व फरार साथीदार यांच्या मदतीने जयस्वाल यांची हत्या घडवल्याचे समजते. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही. परंतु आर्थिक कारणामुळे हत्या झाल्याच्या वृत्ताला खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील दुजोरा यांनी दिला आहे.
जयस्वाल यांच्या घरातील रक्कम चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आरोपींना त्यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांचा खून करून, रक्कम घेऊन बाजवा याचा साथीदार पसार झाल्याचे समजते. परंतु तपासात अद्याप हे समोर आली नसल्याचे उपआयुक्त संजयसिंह येनपुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)