जयस्वाल-शर्मा यांची पालिकेत ‘चाय पे चर्चा’, दाऊदशी लागेबांधे असलेल्या नगरसेवकांची घालमेल वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 05:05 AM2017-09-21T05:05:00+5:302017-09-21T05:05:02+5:30
खंडणी प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला दोन नगरसेवकांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी मंगळवारी केल्याच्या पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख अधिकारी प्रदीप शर्मा यांनी बुधवारी सायंकाळी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन ‘चाय पे चर्चा’ केली. यामुळे संशयाच्या भोव-यात असलेल्या नगरसेवकांची घालमेल वाढली.
ठाणे : खंडणी प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला दोन नगरसेवकांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी मंगळवारी केल्याच्या पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख अधिकारी प्रदीप शर्मा यांनी बुधवारी सायंकाळी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन ‘चाय पे चर्चा’ केली. यामुळे संशयाच्या भोव-यात असलेल्या नगरसेवकांची घालमेल वाढली.
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी कासकर आणि त्याच्या साथीदारांना ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सोमवारी रात्री मुंबईतील नागपाड्यातून अटक केली. या प्रकरणात नगरसेवक आणि काही मोठ्या नेत्यांचा सहभाग असल्याचा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये केला होता. शर्मा यांनी तातडीने जयस्वाल यांची भेट घेतल्याने या प्रकरणात गुंतलेल्या नगरसेवकांवर लागलीच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी गाजलेल्या सुरज परमार आत्महत्या प्रकरणाची माहिती घेण्याकरिता शर्मा हे जयस्वाल यांना भेटले असण्याची शक्यता आहे. भेटीतील चर्चेचा तपशील दोघांनीही उघड केला नाही.
शर्मा यांची ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर ते सहज चहापान करण्यासाठी आले होते, असे जयस्वाल यांनी सांगितले. आमची भेट पूर्वनियोजित होती, असेही ते म्हणाले. शर्मा यांनीही ही भेट अनौपचारिक असल्याचे सांगितले.
>आयबीकडून चौकशी
कासकरची बुधवारी इंटलिजन्स ब्युरोच्या दोन अधिका-यांनी चौकशी केली. मोस्ट वॉण्टेड डॉन दाऊद इब्राहिम याचा कासकर हा भाऊ असून खंडणीवसुलीच्या या प्रकरणात तो दाऊदच्या संपर्कात होता किंवा कसे, याबाबत आयबीच्या अधिकाºयांनी कासकरकडे चौकशी केली. ठाण्यातील वरिष्ठ अधिका-यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला नाही.
>सराफा व्यावसायिकाकडूनही खंडणी
जागेच्या व्यवहारात ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडूनही कासकर याने खंडणी उकळल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. खंडणीपोटी या व्यावसायिकाकडून आरोपींनी १५ लाखांचे सोने वसूल केल्याचे समजते. या सराफा व्यावसायिकाने त्याची जमीन विक्रीला काढली होती. मुमताज इजाज शेख या प्रॉपर्टी एजंटने या जमिनीचा सौदा केला.
दरम्यान, शेख याचे कासकरशी असलेले संबंध या व्यावसायिकास समजल्याने त्याने जमिनीचा सौदा रद्द केला. त्यामुळे शेख आणि त्याचा साथीदार इसरार अली जमील सय्यद यांनी त्या व्यावसायिकाच्या दुकानावर जाऊन धमक्या दिल्या. या ससेमिºयातून
सुटका करून घेण्याकरिता कासकरच्या हस्तकांनी केलेल्या मागणीनुसार त्याने १५ लाखांचे दागिने खंडणी म्हणून दिले. रात्री
उशिरा याप्रकरणीही कासकरवर गुन्हा दाखल केला गेला.