‘जैतापूर’ २0१७ ला सुरू करण्याचे लक्ष्य
By admin | Published: January 25, 2016 11:56 PM2016-01-25T23:56:25+5:302016-01-25T23:56:25+5:30
मोदी, ओलांद यांची घोषणा : ३६ राफेल विमानांच्या सौद्याचा मार्ग प्रशस्त; फ्रान्ससोबत १४ करारांवर स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली : कोकणातील जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प २0१७ च्या प्रारंभी सुरू करण्याचे संयुक्त लक्ष्य भारत आणि फ्रान्सने ठेवले आहे. दोन देशांमध्ये २००८ मध्ये झालेल्या नागरी अणुसहकार्य करारानुसार जैतापूर येथे सहा अणुभट्ट्यांच्या निर्मितीसाठी दोन्ही देशांच्या औद्योगिक कंपन्या २०१६ च्या अखेरपर्यंत तांत्रिक आणि व्यापारविषयक चर्चा पूर्ण करतील. कायमस्वरूपी इंधन पुरवठ्याबाबत हमीची आवश्यकता भारताने स्पष्ट केली असता, त्यालाही फ्रान्सने सहमती दर्शविली आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा तसेच शिवसेनेचा विरोध आहे.
तसेच फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा मार्ग सोमवारी प्रशस्त झाला आहे. राफेल विमानांच्या विक्रीसंबंधी आंतर सरकारी करारावर (आयजीए) स्वाक्षरी झाली असली, तरी काही आर्थिक बाबींमुळे अंतिम करार प्रत्यक्षात येऊ शकला नाही. काही दिवसांतच हा मुद्दा निकालात निघण्याची आशा बळावली आहे. भारत-फ्रान्सदरम्यान सोमवारी राफेल आयजीसह रेल्वे, संस्कृती, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञानासहविविध क्षेत्रांतील एकूण १४ करार अस्तित्वात आले. भारत भेटीवर आलेले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कोईस ओलांद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सखोल चर्चा केल्यानंतर हे करार प्रत्यक्षात येऊ शकले.
दहशतवादाचा मुकाबला, सुरक्षा आणि नागरी अणुसहकार्य या मुद्द्यांना करारात प्रामुख्याने स्थान देण्यात आले आहे. ओलांद यांच्यासोबत दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्तपत्रपरिषदेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आर्थिक बाबी वगळता दोन देशांनी ३६ लढाऊ राफेल विमानांच्या खरेदीबाबत आंतर सरकारी करारावर स्वाक्षरी केली आहे. या विमानांच्या सौद्यासंबंधी आर्थिक बाबी शक्य तेवढ्या लवकर निकालात काढल्या जातील. ओलांद यांनी आयजीएवरीलस्वाक्षरी हे एक निर्णायक पाऊल असल्याचे संबोधले. मोदींनी एप्रिलमध्ये फ्रान्सचा दौरा केला, तेव्हापासून या कराराबाबत चर्चा सुरू होती. राफेल सौद्याबाबत अद्याप अंतिम करार होणे बाकी आहे कारण अजूनही किमतीबाबत चर्चा सुरू आहे. हा सौदा अंदाजे ६० हजार कोटींच्या घरात असेल. फ्रान्सचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ त्याबाबत वाटाघाटी करीत आहे.
दोन्ही नेत्यांनी संरक्षण सहकार्यासोबतच गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पॅरिसमध्ये, तर या महिन्यात पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधात सहकार्य बळकट करण्यावर चर्चेत लक्ष्य केंद्रित केले. पॅरिस ते पठाणकोटपर्यंतचे हल्ले पाहता आम्ही संयुक्तरीत्या आव्हान ठरणारा दहशतवादाचा भयावह चेहरा बघितला आहे. मी अशा दहशतवादी हल्ल्यांविरुद्ध दृढ संकल्प आणि कृतीची प्रशंसा करीत आहे. ओलांद आणि मी दहशतवादविरोधी सहकार्य नव्या उंचीवर नेण्यास सहमत झालो आहोत. त्यामुळे कट्टरतावाद आणि दहशतवादाचा धोका निपटून काढण्यास मदत मिळेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणे, त्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या स्वरूपात मदत करणाऱ्यांविरुद्ध जागतिक समुदायाने निर्णायक कृती करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात सहभागी कटकर्त्यांना पाकिस्तानने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे. या हल्ल्यात फ्रान्सचे दोन नागरिकही मारले गेले होते. पाकिस्तानने भविष्यात असे हल्ले होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनात केले आहे. (वृत्तसंस्था)
———————————————-
कठीणप्रसंगी समर्थनासाठी धन्यवाद : ओलांद
दायेशने आमच्यावर हल्ला केला. इसिस चिथावणी देत आहे. त्यांच्याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या मुलांची हत्या करणाऱ्यांवर आम्ही वारंवार प्रहार करू. या कठीण परिस्थितीत आम्हाला समर्थन दिल्याबद्दल मी भारताला धन्यवाद देतो. फ्रान्स ही बाब कधीही विस्मरणात जाऊ देणार नाही. भारत आणि फ्रान्सने दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सहकार्य बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे कारण दोन्ही देश दहशतवादाचे शिकार बनले आहेत, असे ओलांद यावेळी म्हणाले.
—————————————
—————————-
दहशतवादी संघटनांवर निर्णायक कारवाई
प्रेरक शक्ती कोणतीही असो, दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत न्यायोचित ठरविले जाऊ शकत नाही, असे सांगतानाच संयुक्तनिवेदनात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, हक्कांनी गट तसेच अल्-कायदासारख्या दहशतवादी संघटनांवर निर्णायक कारवाईचा निर्धारही व्यक्त केला आहे. दोन्ही नेत्यांनी पठाणकोट, गुरुदासपूरमध्ये अलीकडेच झालेल्या हल्ल्यांची तीव्र निंदा केली.
भारत-फ्रान्सने गुप्तचर क्षेत्र, आर्थिक, न्याय आणि पोलीस क्षेत्रात आदानप्रदान वाढविण्यास कटिबद्धता दर्शविली आहे. दहशतवादविरोधी प्राधिकरण, विशेषत: सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आल्याचा उल्लेख संयुक्त निवेदनात केला आहे.
दोन देशांच्या
नात्यांचा नवा अध्याय...
४संस्कृती ते संरक्षण क्षेत्रांपर्यंत
आमचे आदर्श पाहता अनेक समानता आढळून येतात. भारताने मला प्रजासत्ताक दिनी मुख्य पाहुणे म्हणून निमंत्रित करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.
४दोन देशांच्या नात्यांचा नवा अध्याय सुरू करण्याची आमची इच्छा आहे, असेही ओलांद यांनी स्पष्ट केले.
‘मेक इन इंडिया’चे स्वागत...
४मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’या मोहिमेचे मी स्वागत करतो. भारतात काम करीत असलेल्या फ्रान्सच्या कंपन्यांनी त्यात स्वारस्य
दाखविले आहे.
४फ्रान्सचे तंत्रज्ञान विशेषत: वाराणसीत उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.