जैतापूरचा वाद अनाठायी होता, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 02:00 PM2017-12-17T14:00:23+5:302017-12-17T14:00:32+5:30
प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभुषण अनिल काकोडकर यांनी जैतापूरवरून उद्भवलेला वाद हा अनाठायी होता, असा टोला शिवसेनेचे नाव न घेता हाणला.
- अनंत जाधव
सावंतवाडी : ओखी वादळाचे भविष्यातील दुष्परिणाम बघण्यापेक्षा आपले विज्ञान किती प्रगत आहे ते बघा. यापूर्वी जेवढी वादळे आली ती नुकसान करून गेली. पण ओखी वादळ हे येणार असल्याचे पूर्वीच कळल्याने त्यापासून मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळण्यात यश आले. हा सकारात्मक बदल आहे. तो आपण स्वीकारला पाहिजे. कोणतेही वादळ झाले तरी समुद्रात थोडेफार त्याचे परिणाम हे जाणवतच असतात. पण ते फार काळ टिकणारे नसतात, असे मत प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभुषण अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी जैतापूरवरून उद्भवलेला वाद हा अनाठायी होता, असा टोलाही त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता हाणला.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्र येथे मराठी विज्ञान परिषदेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणातील अनेक प्रकल्पांविषयी आपली मते मांडली.
काकोडकर म्हणाले, जैतापूर प्रकल्प हा हानिकारक नाही हे मी पहिल्यापासून सांगत होतो. आजही सांगत आहे. कैगा येथील अणूउर्जा प्रकल्प तयार केला त्यावेळी तेथील जमीन सुपीक, हिरवीगार होती. आजही ती तशीच आहे. जैतापूरमध्ये तर त्याच्या उलट आहे. जमीन खडकाळ आहे. जर प्रकल्प झाला तर भविष्यात ही जमीन हिरवीगार होईल याची मला खात्री आहे. या प्रकल्पाचा कोणताही परिणाम मत्स्यालयावर होणार नाही. समुद्रात सोडण्यात येणारे पाण्याचे तपमानही कमी असणार आहे. त्याचा कोणताही परिणाम मत्स्यांवर होणार नाही, असा विश्वासही काकोडकर यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी जपानमधील अणूऊर्जा प्रकल्पाचे उदाहरण देत तेथे जेव्हा अणूउर्जा प्रकल्प येणार होता. त्यावेळी येथे ज्या प्रकारे विरोध झाला तसाच विरोध तेथे मच्छिमारांनी केला होता. त्यावेळी तेथील शासनाने त्यांना एक पॅकेज दिले. त्यानंतर मच्छिमार शांत झाले आणि हा प्रकल्प सुरू केला. पण जेव्हा प्रकल्प सुरू झाला, त्यानंतर दोन ते तीन वर्षांनी प्रकल्प काही काळासाठी बंद करण्याची वेळ आली, तेव्हा तेथील मच्छिमारांनी पुन्हा तो अणुउर्जा प्रकल्प सुरू करावा यासाठी आंदोलन केले. त्याचा बोध सर्वांनी घ्यावा, असे काकोडकर यांनी अप्रत्यक्षरित्या जैतापूर प्रकल्पाला विरोध करणा-यांना सांगितले.
कोकण किनारपट्टीवर अनेक हानिकारक प्रकल्प येत असतील तर ते चुकीचे आहे. मी त्यांचे समर्थन करणार नाही. पर्यावरणही टिकले पाहिजे हे माझे व्यक्तिगत मत आहे. पण असे कोणते प्रकल्प येतात याची मला माहिती नाही. जैतापूरच्या बाजूला होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत आपणास काही माहिती नाही. त्यामुळे त्यात बोलणार नाही. कारण जैतापूरचा प्रश्न वेगळा होता. मी त्याचा पूरेपूर असा अभ्यास केला होता. त्यामुळे त्याबद्दल मी बोलू शकत होतो, असे सांगत त्यांनी कोकणात होऊ घातलेल्या इतर प्रकल्पांविषयी बोलण्याचे टाळले.
ओखी वादळानंतर समुद्रातील मत्स्यांवर मोठा परिणाम झाला. याचे परिणाम भविष्यात दिसतील का? असा सवाल काकोडकर यांना केला असता त्यांनी विज्ञान किती प्रगत झाले त्याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. ओखी वादळ येण्यापूर्वी ते समुद्रकाठच्या मच्छिमारांना कळले होते. सगळ््यांनी आपल्या होड्या किनारी आणून लावल्या होत्या. त्यामुळे होणारे मोठे नुकसान टाळता आले. यापूर्वी जेवढी वादळे झाली त्यातून झालेले नुकसान प्रत्येकाने बघितले पाहिजे. पण ओखी वादळाचे काही परिणाम जाणवत असतील, पण मोठे नुकसान टाळण्यात आपण यशस्वी ठरलो. हे सर्व विज्ञानामुळे घडल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जैतापूरचा वाद हा अनाठायी होता. मी याबाबत अनेक वेळा त्यावर स्पष्टीकरण दिले होते. असे प्रकल्प आपल्याकडे आहेत. उर्जानिर्मितीसाठी प्रकल्प आलेच पाहिजेत. त्यामुळे जैतापूरचे समर्थन मी केल्याने मला त्रास वगैरे काही झाला नाही. पण सत्य सांगणे गरजेचे होते. त्यावेळीही मी सांंगत होतो आणि आजही सांगतो. जैतापूरचा वाद हा अनाठायी होता, असा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता हाणला.
जैतापूरमुळे माशांवर परिणाम नाही याची खात्री देतो
अणूउर्जा प्रकल्पाचे पाणी समुद्रात सोडले जाणार. त्यामुळे त्याचा मत्स्यांवर परिणाम होणार असे सांगितले जाते. पण तसे काही होणार नाही याची मी खात्री देतो. जे समुद्रात पाणी सोडले जाणार त्याचे तापमान एवढे कमी असणार की त्याचा परिणाम माशांवर होणार नाही. उलट त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील याची मी खात्री देतो. माझ्यावर विश्वास ठेवा, असे यावेळी अनिल काकोडकर यांनी सांगितले.