जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा - रामदास आठवले
By admin | Published: February 13, 2015 01:23 AM2015-02-13T01:23:59+5:302015-02-13T01:23:59+5:30
आरोंदा जेटी प्रश्नी स्थानिक ग्रामस्थांबरोबर आम्ही राहणार असून, केंद्र सरकारने अणुऊर्जेबाबत पुनर्विचार करून जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा,
कणकवली : आरोंदा जेटी प्रश्नी स्थानिक ग्रामस्थांबरोबर आम्ही राहणार असून, केंद्र सरकारने अणुऊर्जेबाबत पुनर्विचार करून जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सांगितले.
देशाला ऊर्जेची आवश्यकता आहे. मात्र, अणुऊर्जेव्यतिरिक्त इतर बाबींचा विचार शासनाने करावा. जनतेला प्रकल्पांमुळे त्रास होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी, अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
झोपड्यांना संरक्षण देणारा कायदा करावा, बेरोजगारांना नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांत नोकरी न मिळाल्यास बेरोजगार भत्ता द्यावा, मुंबई येथील इंदू मिलच्या जागेत बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात दीडशे कोटींची तरतूद शासनाने करावी इतर मागण्या पक्षाच्यावतीने करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.