नाटेमध्ये जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलन
By admin | Published: October 3, 2016 04:26 AM2016-10-03T04:26:54+5:302016-10-03T04:26:54+5:30
‘नको अणुऊर्जा’, ‘अणुऊर्जा हटाव- कोकण बचाव’ अशा घोषणा देत नाटे गावातील सोनारगडगा येथील दोन दिवसीय धरणे आंदोलनाला रविवारी सुरुवात झाली.
राजापूर (जि. रत्नागिरी) : ‘नको अणुऊर्जा’, ‘अणुऊर्जा हटाव- कोकण बचाव’ अशा घोषणा देत नाटे गावातील सोनारगडगा येथील दोन दिवसीय धरणे आंदोलनाला रविवारी सुरुवात झाली. शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी, पर्यावरणवादी नेत्या वैशाली पाटील यांच्यासह शेकडो गावकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितीत कोकणचे नुकसान करणारा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प येथून हद्दपार झालाच पाहिजे, अशी मागणी या वेळी केली.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा पर्यावरणासह मानवी जीवन व मच्छीमारी, बागायती, भातशेती यावर परिणाम होईल, या भीतीने परिसरातील ग्रामस्थ या प्रकल्पाला जोरदार विरोध करीत आहेत. या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. जनहक्क समिती व शिवसेना यांच्यावतीने आता हे दोन दिवसीय आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहीद झालेल्या तबरेज सायेकर यांच्या स्मारकाजवळ पहिल्या दिवशी आंदोलक जमा झाले. या वेळी या प्रकल्पविरोधी घोषणा व काळेझेंडे दाखवले. (प्रतिनिधी)
खासदार विनायक राऊतही आज आंदोलनात
आज सोमवारी दुसऱ्या दिवशी खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन होणार आहे.