जलतज्ज्ञ, साहित्यिक मुकुंद धाराशिवकर यांचे निधन
By admin | Published: February 13, 2016 11:51 PM2016-02-13T23:51:52+5:302016-02-13T23:51:52+5:30
जलतज्ज्ञ, साहित्यिक तथा अभ्यासू अभियंता मुकुंद धाराशिवकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी पहाटे येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानावरून
धुळे: जलतज्ज्ञ, साहित्यिक तथा अभ्यासू अभियंता मुकुंद धाराशिवकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी पहाटे येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे़ शुक्रवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले़ खासगी रूग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली़ त्यांच्या पश्चात पत्नी मीरा, मुलगा गंधार आणि मुलगी गांधाली असा परिवार आहे़
पाणी या विषयावर त्यांनी विपूल लेखन केले आहे़ जल, विज्ञान आणि स्थापत्य या विषयांचा त्यांचा अभ्यास होता. दिल्ली,कोलकाता, चेन्नई, मुंबई येथील विविध संस्थांशी ते संलग्न होते. त्यांच्या विपुल व वैविध्यपूर्ण लेखनाबद्दल त्यांना शासनाचे पाच पुरस्कार मिळाले आहेत़ ‘आॅपरेशन भागीरथी’ या कादंबरीला सर्वोत्कृष्ट लेखनाचे राज्य पारितोषिक (२००८) मिळाले. तर ‘लिलिपुटच्या शोधात’ ही कांदबरी बालसाहित्य रत्न पुरस्काराची मानकरी ठरली. वैविध्यपूर्ण लिखाणासाठी ‘लोकमत’नेही त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले होते. ‘जलसंवाद’ या मासिकाचे ते डॉ. देशकरांबरोबर संपादन करायचे. भारतीय जलसंस्कृती मंडळ व महाराष्ट्र सिंचन सहयोग या दोन संस्थांच्या कार्यकारिणीवर ते आहेत. कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ‘सार’ संस्थेचे ते सचिव आहेत. (प्रतिनिधी)
पुस्तक प्रकाशनाआधीच...
मुकुंद धाराशिवकर यांच्या ‘अभिजित अफलातून सागराच्या पोटातून’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रविवारी सकाळी धुळ््यात होणार होता. पण त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.