जलदूत एक्स्प्रेस पुन्हा सुरू

By admin | Published: May 26, 2016 02:17 AM2016-05-26T02:17:29+5:302016-05-26T02:17:29+5:30

वारणा धरणातून सोडलेले पाणी बुधवारी मिरजेपर्यंत पोहोचल्यानंतर गेले पाच दिवस बंद असलेली जलदूत एक्स्प्रेस सायंकाळी लातूरला पाठविण्यात आली.

Jaldoot Express resume | जलदूत एक्स्प्रेस पुन्हा सुरू

जलदूत एक्स्प्रेस पुन्हा सुरू

Next

मिरज (जि. सांगली) : वारणा धरणातून सोडलेले पाणी बुधवारी मिरजेपर्यंत पोहोचल्यानंतर गेले पाच दिवस बंद असलेली जलदूत एक्स्प्रेस सायंकाळी लातूरला पाठविण्यात आली.
मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ नदीपात्र कोरडे पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा शुक्रवारपासून बंद झाला होता. त्यामुळे पाच दिवस दररोज लातूरला पाणी घेऊन जाणारी जलदूत एक्स्प्रेस बंद झाली. पाण्याअभावी म्हैसाळ उपसा सिंचन योजनासुध्दा बंद झाल्याने वारणा धरणातून रविवारी पाणी सोडण्यात आले.
बुधवारी सकाळी मिरजेत नदीपात्रात पाणी आल्यानंतर रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा करणारे दोन्ही पंप सुरू करून हैदरखान विहिरीत पाणी साठा करण्यात आला. सायंकाळी चारपर्यंत जलदूत एक्स्प्रेसचे ५० टँकर भरून लातूरला पाठविण्यात आले.
मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मिरज रेल्वेस्थानकाला व रेल्वे वसाहतीला गेले पाच दिवस टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होता. मिरज रेल्वेस्थानकात पाणी टंचाईमुळे रेल्वेगाड्यांत मिरजेऐवजी पुणे व हुबळी स्थानकात पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरज स्थानकात पाणी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. आता जलदूत एक्स्प्रेस दररोज मिरजेतून पाठविण्याचे नियोजन सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पाण्याचा वेग कमी असल्याने म्हैसाळ बंधाऱ्यात अद्याप पुरेसा साठा झालेला नाही. गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद असून ते कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Jaldoot Express resume

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.