गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 07:52 AM2024-09-17T07:52:45+5:302024-09-17T07:54:40+5:30

प्रत्येक नेत्याला वाटतं मी ३० वर्ष निवडून आलोय मग आता मला काही होणार नाही. मात्र तेव्हा कार्यकर्त्यांची एकसंघ फळी होती ती आता दुभंगली आहे असं दिलीप खोडपे यांनी सांगितले. 

Jalgaon Jamner BJP leader Dilip Khodpe will join NCP Sharad Pawar faction, will contest against Girish Mahajan | गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार

गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार

जळगाव - मागील ३० वर्षापासून जामनेर मतदारसंघावर भाजपा नेते गिरीश महाजन यांचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. संजय गरूड हे महाजनांना नेहमी आव्हान देत होते. परंतु गरूड आता भाजपात गेल्यानं यंदाच्या निवडणुकीत गिरीश महाजनांना टक्कर कोण देणार याची चर्चा होती. मात्र भाजपाशी ३५ वर्ष एकनिष्ठ राहिलेले दिलीप खोडपे हे लवकरच राष्ट्रवादीची तुतारी हाती घेऊन गिरीश महाजनांविरोधात दंड थोपटणार आहेत. 

माध्यमांशी दिलीप खोडपे यांनी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, ध्येय धोरणे सोडून काही नेते जे वागतायेत ते पटत नाही. मागील पंचवार्षिकला मी विधानसभेचा अर्ज घेतला. त्यावेळी मला सगळ्याच प्रक्रियेतून डावललं गेले. कुठल्याही निर्णयात मला सामावून घेतले नाही. त्यामुळे मी दुखावलो होतो. गिरीशभाऊ मंत्री झाल्यानंतर ठराविकच लोक पुढे पुढे करायचे. १०० किमी लांबून आलेल्या लोकांना त्यांच्या समस्या मांडता येत नव्हत्या. गिरीशभाऊही ऐकून घेत नाहीत. मंत्री झाल्यापासून कार्यकर्त्यांना दाद दिली जात नाही. त्यामुळे आपण काही पाऊल उचलायला पाहिजे यातून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्यावेळी मी विधानसभेचा अर्ज घेतला तेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझ्या संपर्कात होते. परंतु गिरीश महाजनांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर मी थांबलो होतो. योग्य सन्मानाने वागवलं जाईल अशी आमची अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा फोल ठरली. तालुक्यात अनेक निवडणुका झाल्या त्या निर्णय समितीत मला सहभागी केले नाही. कालपर्यंत मी सर्व प्रक्रियेत सहभागी होतो अचानक मला दूर केले गेले. तालुका, जिल्हास्तरीय राष्ट्रवादी नेत्यांनी संपर्क करून जयंत पाटलांशी बोलणं करून दिले आहे. मी राष्ट्रवादीत जातोय. इथल्या कार्यकर्त्यांनी माझ्या नावाची शिफारस केली आहे असं सांगत गिरीश महाजनांविरोधात निवडणुकीत उभे राहण्याचे संकेत दिलीप खोडपे यांनी दिले. 

दरम्यान, प्रत्येक नेत्याला वाटतं मी ३० वर्ष निवडून आलोय मग आता मला काही होणार नाही. मात्र तेव्हा कार्यकर्त्यांची एकसंघ फळी होती ती आता दुभंगली आहे. त्यामुळे आता गिरीश महाजनांचा विजय निश्चित नाही. भाजपा एकसंघ राहिला नाही. त्यामुळे लढत नक्कीच होणार आहे. गिरीश महाजनांशी मी जाहीर आणि वैयक्तिक बोललो, तरी सुधारणा झाली नाही. त्यामुळे मला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. महाजन राज्यात वेळ देऊ शकतात पण जामनेर मतदारसंघात वेळ देत नाही. कार्यकर्ते नाराज आहेत. पक्ष सोडण्याची वेळ माझ्यावर का आली याचा विचार त्यांनी करायला हवा. गिरीश महाजन आणि आम्ही एकत्रित राजकारणाला सुरुवात केली होती. ज्यावेळी पक्षात उभं राहायला कुणी तयार नव्हतं तेव्हा आम्ही संघर्ष केला आता पक्षाला चांगले दिवस आलेले असताना आम्हाला डावललं जातंय अशी खंत दिलीप खोडपे यांनी व्यक्त केली. 

Web Title: Jalgaon Jamner BJP leader Dilip Khodpe will join NCP Sharad Pawar faction, will contest against Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.