मृत्यूचा ट्रॅक, ट्रॅकवर भयंकर दृश्य: मृतदेहांचा खच, जखमींचे विव्हळणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 06:35 IST2025-01-23T06:33:40+5:302025-01-23T06:35:08+5:30
Jalgaon Railway Accident: परधाडे रेल्वेस्टेशनजवळ झालेल्या रेल्वे अपघातानंतर कुणाचे हात, कुणाचे पाय, तर कुणाचे अर्धे धड रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेले होते. जखमी प्रवाशांना होत असलेल्या वेदनांमुळे ते किंचाळत होते.

मृत्यूचा ट्रॅक, ट्रॅकवर भयंकर दृश्य: मृतदेहांचा खच, जखमींचे विव्हळणे
- भूषण श्रीखंडे
जळगाव - परधाडे रेल्वेस्टेशनजवळ झालेल्या रेल्वे अपघातानंतर कुणाचे हात, कुणाचे पाय, तर कुणाचे अर्धे धड रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेले होते. जखमी प्रवाशांना होत असलेल्या वेदनांमुळे ते किंचाळत होते. हा किंचाळण्याचा आवाज अजूनही कानात व मनात गुंजत असल्याचा अनुभव कर्नाटक (बंगळुरू) एक्स्प्रेसमधील प्रवासी नागनाथ घोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.
जळगाव जिल्ह्यातील पाचोराजवळील परधाडे येथील रेल्वे ट्रॅकवर बुधवारी सायंकाळी चार वाजता ही अपघाताची घटना घडली. या घटनेची आपबिती सांगताना घोडके म्हणाले की, चार वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानक सोडल्यावर काही अंतरावर गाडी आली असता बाजूच्या ट्रॅकवर उभी असलेली दिसली. या थांबलेल्या गाडीतील प्रवासी वेगात असलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली आल्याने प्रवाशांचा एकच आक्रोश सुरू झाला. सर्वत्र रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज झाल्याने काही अंतरावर गाडी लगेच थांबली. गाडीतील सर्व प्रवाशांसह मीदेखील खाली उतरलो. गाडीखालील व ट्रकच्या बाजुला मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. हे भयंकर दृश्य पाहून मी जागेवरच बसलो.
पुष्पक एक्स्प्रेस ही एका पुलावरील वळणाच्या ट्रॅकवर थांबलेली होती. या घटनेदरम्यान प्रवाशांच्या समोर कर्नाटक एक्स्प्रेस आल्याने अनेकांनी जीव वाचविण्यासाठी पुलाखाली उड्या मारल्या. त्यात ते प्रवासी गंभीर जखमी झाल्यामुळे ते विव्हळत असल्याचे भयंकर दृश्य दिसून आले.
ताशी ११० किमी वेगाने आली कर्नाटक एक्स्प्रेस आणि...
पुष्पक एक्स्प्रेसच्या इंजिनच्या मागील डब्यातील प्रवाशांना धूर निघत असल्याचे दिसले. त्यातील काहींनी इंजिनच्या दिशेने डोकावून पाहिले. तेव्हा इंजिनमधून धूर निघत असल्याचा अंदाज काही प्रवाशांनी बांधला.
या दरम्यान डी-३ या बोगीतील प्रवाशांनी चैन ओढली. त्यानंतर पुष्पक एक्स्प्रेस परधाडे स्टेशननजीक असलेल्या पुलानजीक थांबली. यादरम्यान जनरल बोगीतील काही प्रवासी खाली उतरले. ते समोरच्या रेल्वेरुळांवर जाऊन उभे राहिले.
तशातच समोरून ताशी ११० किलोमीटर वेगाने कर्नाटक एक्स्प्रेस आली आणि रुळावर उभ्या प्रवाशांना चिरडत गेली. या एक्स्प्रेसच्या चालकानेही रेल्वेचा वेग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना मृत्यूची धडक बसून चुकली होती.