दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 05:03 PM2024-11-15T17:03:48+5:302024-11-15T17:06:40+5:30

अजय पाटील,जळगाव Gulabrao Devkar vs Gulabrao Patil: : जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमध्ये हमखास मंत्रिपद देणारा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ...

jalgaon rural assembly elections 2024 gulabrao patil vs gulabrao deokar mahayuti maha vikas Aghadi | दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?

दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?

अजय पाटील,जळगाव
Gulabrao Devkar vs Gulabrao Patil: : जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमध्ये हमखास मंत्रिपद देणारा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात २०१४ नंतर पुन्हा आजी-माजी पालकमंत्र्यांची हायव्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर हे दोन्ही दिग्गज नेते आमने-सामने आल्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, मुख्य लढत ही शिंदेसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यातच आहे. हे दोन्ही उमेदवार आतापर्यंत दोन वेळा आमने-सामने आले आहेत. त्यात २००९ मध्ये गुलाबराव कर यांनी बाजी मारली होती. तर २०१४ व २०१९ मध्ये गुलाबराव पाटील यांनी बाजी मारली होती.

त्यामुळे दोन्ही 'गुलाब'रावांच्या लढाईत मतदार यावेळी कोणत्या गुलाबरावांच्या पारड्यात मतांचे फूल टाकतात, हे २३ रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आतापासून जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचारसभा व मेळावे होतांना दिसत आहेत.

गुलाबराव पाटलांचे प्रचारातील मुद्दे 

मतदारसंघातील शेत रस्त्यांची कामं मार्गी लावण्यात आली. भोकर ते खेडी भोकरीदरम्यानच्या तापी नदीवरील पुलाच्या कामासाठी १५० कोटींचा निधी आणून, कामाला सुरुवात खरीप पीकविम्यांतर्गत ५०० कोटींची नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून दिली. 

जळगाव ग्रामीणमधील अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची कामं मार्गी लावण्यात आली. जळगाव शहरापासून ते भोकरपर्यंतच्या रस्त्याचे १०० कोटींच्या निधीतून रुंदीकरण करण्यात आले. लाडकी बहीण योजनेतून जळगाव ग्रामीण मतदारसंघातील १ लाख महिलांना लाभ मिळाला. 

गुलाबराव देवकर यांचे प्रचारातील मुद्दे 

धरणगाव शहरासह जळगाव ग्रामीणमध्ये अवैध धंद्यांना अटकाव करण्यास सरकार अपयशी ठरले आहे.

गिरणा बलून बंधाऱ्यांचे रखडलेले काम, मतदारसंघात झालेल्या रस्त्यांच्या कामांचा गुणवत्तेचा प्रश्न धरणगाव शहरासह अनेक मोठ्या गावांमध्ये निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा मुद्दा. लाडकी बहीण योजनेला निधी दिला, दुसरीकडे महागाई वाढली.

थेट आमने-सामने लढाईत सरस कोण...?

मतदारसंघ तयार झाल्यानंतर २००९, २०१४ व २०१९ या तीन निवडणुकांमध्ये तिरंगी लढत झाल्या आहेत. तर यंदा थेट आमने-सामने लढत रंगत आहे. २००९ मध्ये गुलाबराव पाटील, गुलाबराव देवकर व ललित कोल्हे यांच्यात लढत झाली होती. २०१४ मध्येही गुलाबराव पाटील, गुलाबराव देवकर व पी. सी. पाटील यांच्यात लढत झाली.

२०१९ मध्येही गुलाबराव पाटील, पुष्पा महाजन व चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात लढत झाली. मात्र, यंदा या मतदारसंघात जरी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खऱ्या अर्थाने गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर यांच्यातच खरी लढत रंगणार आहे. त्यामुळे थेट आमने-सामनेच्या या लढाईत कोणाचा गुलाल उडणार, याकडे लक्ष लागले आहे.

दोन्ही उमेदवारांची 'बलस्थाने' काय?

गुलाबराव पाटील - सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला ६३ हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. २०१९च्या निवडणुकीत बंडखोर उमेदवारामुळे भाजपच्या मतांचे विभाजन झाले होते. मात्र, यंदा भाजपची पूर्ण रसद गुलाबराव पाटलांच्या सोबत.

गुलाबराव देवकर - गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासोबत उद्धवसेनेच्या संघटनेची ताकद मिळणार आहे. दहा वर्षापासून मतदारसंघात एकच आमदार असल्याने, अॅन्टीइन्कबन्सीचा फायदा घेण्याचा देवकरांचा प्रयत्न राहणार आहे.

Web Title: jalgaon rural assembly elections 2024 gulabrao patil vs gulabrao deokar mahayuti maha vikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.