सोलापूरसह जळगाव ३७, मुंबई ३४ अंशावर; आॅक्टोबर हीटचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 03:01 AM2018-10-10T03:01:27+5:302018-10-10T03:01:43+5:30
मान्सूनने माघार घेतल्यानंतर राज्यातील आॅक्टोबर हीटचा तडाखा दिवसागणिक वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील काही शहरांचे कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, वाढता उकाडा आणि ऊन नागरिकांचा घाम काढत आहे.
मुंबई : मान्सूनने माघार घेतल्यानंतर राज्यातील आॅक्टोबर हीटचा तडाखा दिवसागणिक वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील काही शहरांचे कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, वाढता उकाडा आणि ऊन नागरिकांचा घाम काढत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी जळगाव आणि सोलापूर शहराचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश नोंदविण्यात येत होते.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.
विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात बदल नोंदविण्यात येत असतानाच, ११ आॅक्टोबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
१२ आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. १३ आॅक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
आकाश ढगाळ राहणार
मुंबईचा विचार करता, मंगळवारी सकाळी पूर्व आणि पश्चिम उपनगरावर मळभ दाटून आले होते. मुंबई शहरात आकाश मोकळे होते. सकाळी साडेअकरानंतर मात्र मळभ हटले आणि सूर्यकिरणांच्या प्रखर माऱ्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागले. बुधवारसह गुरुवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
राज्यातील शहरांचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये
सोलापूर ३७
सांगली ३४
सातारा ३२
कोल्हापूर ३३
जळगाव ३७
नाशिक ३४
पुणे ३४
वेंगुर्ला ३५
रत्नागिरी ३२
औरंगाबाद ३५
नांदेड ३५
परभणी ३६