अपूर्ण घरकूल उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 08:45 AM2017-08-04T08:45:05+5:302017-08-04T08:45:21+5:30

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर करत दहा वर्षात ३७ हजार ८८५ जणांना घरकूलांचा लाभ मिळवून देत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. 

 Jalgaon tops in incomplete household budget | अपूर्ण घरकूल उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव राज्यात अव्वल

अपूर्ण घरकूल उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव राज्यात अव्वल

googlenewsNext

जळगाव,दि.४ - जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत २००६ पासून ४१ हजार ९७८ घरकूले अपूर्ण होती. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर करत दहा वर्षात ३७ हजार ८८५ जणांना घरकूलांचा लाभ मिळवून देत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. या कामगिरीमुळे या अपूर्ण घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

इंदिरा आवास योजना असे योजनेचे पूर्वीचे नाव आहे़ २०१५ पासून ही योजना प्रधानमंत्री आवास योजना या नावाने रुपांतरीत झाली़ २००५-०६ या आर्थिक वर्षात या योजनेतंर्गत ४१ हजार ९७८ घरकुले पूर्ण करण्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसमोर आव्हान होते़ ते पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. प्रत्येक तालुक्यात शिबिर, सभा घेण्यात आल्या़ यात अडचणी, तसेच आवश्यक त्या सूचनांचे मार्गदर्शन अधिकाºयांना तसेच लाभार्थींना करण्यात आले.

३७ हजार ८८५ जणांचे घराचे स्वप्न साकार
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत विभागाने गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील ३७ हजार ८८५ जणांच्या घराचे स्वप्न साकार करीत घरकुले मिळवून दिली आहे़ प्रत्येक लाभार्थीच्या थेट खात्यावर तीन टप्प्यात अनुदान जमा झाले. केवळ अनुदानच नाही तर घरकुले पूर्ण होईपर्यंत विभागाने पाठपुरावा केला. यात प्रत्येक घरकुलात शौचालयाबाबतही विशेष काळजी घेण्यात आली.

तंत्रज्ञान विकसीत केले
घरकुले पूर्ण करण्यासाठी विभागाने केवळ सभा, शिबिरेच नाही तर तंत्रज्ञानाचाही वापर केला़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा समन्वयक सुनील मोरे यांनी गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसीत केले़ या तंत्रज्ञानानुसार मोरे यांच्याकडून यानुसार प्रत्येक तालुका, गाव येथील कामांचा आढावा घेतला जात होता़ व काम पूर्ण होईपर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्याच्या कामावर संनियंत्रण ठेवण्यात आले.

हॉटस् अ‍ॅपचाही केला उपयोग
हॉटस्अ‍ॅप व सोशल मीडीयाचाही उद्दीष्ट पूर्ण करताना वापर झाला़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉटस् अ‍ॅपवर ग्रुप तयार करण्यात आला़ यात प्रकल्प संचालक, जि़प़मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अभियंता, उपअभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, संगणक परिचालक तसेच घरकुलाशी संबंधित सर्व यंत्रणा यांचा समावेश होता़ गु्रपव्दारे दररोज कामाचा आढावा घेतला गेला़ व अडचणी तत्काळ सोडविण्यात आल्या़ परिणामी आपोआपच कामाचा वेग वाढला.
आर्थिक जातीनिहाय सर्वेक्षणातील १२ हजार ७५७ जणांना घरकुले
अपूर्ण घरकुलांची उद्दिष्टपूर्ती करत असताना इतर योजनेतील घरकुल उद्दिष्टपूर्तीकडे विभागाचे दुर्लक्ष झाले नाही़ २०११ मध्ये शासनाने केलेल्या सामाजिक आर्थिक जातनिहाय सर्वेक्षणनुसार ८३ हजार ४९४ लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी पात्र ठरले होते़ २०१६-१७ या आर्थिक वर्षात त्यापैकी १२ हजार ७५७ जणांना विभागाने लाभ मिळवून घरकुले पूर्ण केली आहे़ तसेच गेल्या वर्षी शबरी , रमाई तसेच पारधी या तिन्ही योजनेतील उद्दीष्टांनुसार एकूण तीन हजार १६८ लाभार्थींचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण केले आहे़

राज्यात जिल्हा अव्वल
घरकुले ४१९७८
पूर्ण ३७८८५
अपूर्ण ४०९३
९० टक्के काम पूर्ण

कोट
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याच्या उपक्रमात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समिती, गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांचे सहकार्य मिळाले़ हे पूर्ण यंत्रणेचे यश आहे़ आगामी काळात विविध योजनांच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये जिल्हा कसा अव्वल राहिल, यासाठी प्रयत्नशिल आहे़
- विक्रांत बगाडे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

Web Title:  Jalgaon tops in incomplete household budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.