जालन्यात विराट मराठा मोर्चा!
By Admin | Published: September 19, 2016 08:16 PM2016-09-19T20:16:34+5:302016-09-19T20:16:34+5:30
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ व अन्य मागण्यांसाठी शहरात सोमवारी काढण्यात आलेल्या विराट मराठा क्रांती मूकमोर्चातील नि:शब्द हुंकाराने तमाम जालनेकरांना स्तब्ध केले
ऑनलाइन लोकमत
जालना, दि. १९ : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ व अन्य मागण्यांसाठी शहरात सोमवारी काढण्यात आलेल्या विराट मराठा क्रांती मूकमोर्चातील नि:शब्द हुंकाराने तमाम जालनेकरांना स्तब्ध केले. मोर्चात मुली आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या मूकमोर्चाने यापूर्वीचे जिल्ह्यातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. विशेष म्हणजे मोर्चेकरी महिलांची रांग ही ७ कि़ मी. पर्यंत होती. शिस्तबद्ध काढलेल्या मोर्चाच्या निमित्ताने मराठा एकीचे दर्शन झाले.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ व आरक्षण, अॅट्रासिटी कायद्यातील बदल, स्वामीनाथन आयोग लागू करणे, चित्रपट व नाटकांतून समाजाची बदनामी थांबविणे आदी मागण्यांसाठी सोमवारी सकाळी ८ वाजताच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून समाजबांधव शिवाजीपुतळा परिसरात जमा होण्यास सुरुवात झाली. सकाळी ११.४५ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास एका मुलीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चास सुरुवातीला मुली, युवती त्यानंतर महिलांचा सहभाग होता. शिवाजी पुतळा, पाणीवेस, गरीबशहा बाजार, मंमादेवी, मस्तगड, गांधीचमन, कचेरी रोड, शनीमंदीर, उड्डाणपूल मार्गे मोर्चा अंबड चौफुलीवर पोहोचला. तेव्हा मोर्चातील शेवटची महिला ही शिवाजी पुतळा परिसरात होती. ७ किलोमीटर अंतरापर्यंत मुली आणि महिलांची रांग होती.
त्यानंतर डॉक्टर्स, वकील, शिक्षक, अभियंता, युवक, मुले, व्यापारी, ज्येष्ठ समाजबांधव व मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठीतांचा सहभाग होता. तर मंठा रोडवर १० कि़मी. पर्यंत मोर्चेकऱ्यांची वाहने थांबून होती. शहरातील क्रीडासंकुल, आझादमैदान, मातोश्री लॉन्स, भक्त कॉलेज आदी भागांत वाहनांच्या पार्कींगसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मोर्चामार्गावर ध्वनीक्षेपनाची व्यवस्था करण्यात आल्याने संयोजकांकडून मार्गदर्शन केले जात होते. मोर्चा अंबड चौफुलीवर पोहोचल्यानंतर मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर समाजबांधव थांबले होते.
अनेकांना अंबड चौफुलीपर्यंत पोहोचता आले नाही. प्रचंड गर्दीमुळे मोर्चाचा समारोप झाल्यानंतर त्यांना तेथूनच परतावे लागले. अंबड चौफुलीवर मोर्चा पोहोचल्यानंतर प्रारंभ नऊ मुलींनी जिजाऊ वंदना गायली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एका मुलीने समाजबांधवांसमोर निवेदनाचे वाचन केले. याप्रसंगी कोपर्डी येथील पिडीत मुलीसह काश्मीरमधील उरी येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने मोर्चा समारोप झाल्याचे जाहीर करण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध काढण्यात आलेल्या मूक मोर्चाने जिल्ह्यातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले असून, जिल्ह्यात ‘न भूतो न भविष्यती’ असाच हा मोर्चा ठरला आहे. मोर्चात जवळपास २० लाख समाजबांधव सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. मोर्चात जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतून समाजबांधव सहभागी झाले होते.