जालना-शिर्डी डेमू रेल्वेला हिरवी झेंडी
By Admin | Published: June 4, 2017 01:14 PM2017-06-04T13:14:08+5:302017-06-04T13:14:08+5:30
नगरसोल डेमू रेल्वेचा शिर्डीपर्यंत विस्तार करण्यात आला असून, शनिवारी या रेल्वेगाडीचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी
औरंगाबाद, दि. 4 - जालना - नगरसोल डेमू रेल्वेचा शिर्डीपर्यंत विस्तार करण्यात आला असून, शनिवारी (दि.३) या रेल्वेगाडीचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी येथून रिमोट व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून उद््घाटन केले. तसेच औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील वायफाय सुविधा, व्हीआयपी कक्ष, प्लॅटफॉर्म क्रमांक- २ व ३ वरील शेड आणि मुकुंदवाडी स्टेशनवरील आरक्षण प्रणालीचेही लोकार्पण करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथे आ. संजय शिरसाट, महापौर भगवान घडामोडे, नगरसेवक नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, दक्षि ण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) डॉ. ए. के. सिन्हा, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा, रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांची उपस्थिती होती.
या सोहळ्यात बोलताना आ. शिरसाट म्हणाले, रेल्वेचे अधिकारी येतात तेव्हाच रेल्वेस्टेशनवर स्वच्छता दिसते. आजही हीच परिस्थिती दिसते. परंतु सोहळ्यानिमित्त दिसणारी स्वच्छता कायम दिसली पाहिजे, असे ते म्हणाले. महापौर घडामोडे म्हणाले, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन येथे नागरिकांच्या सुविधेसाठी उड्डाणपूल आवश्यक आहे.
ए. के. सिन्हा म्हणाले, औरंगाबाद रेल्वेस्टेशन राज्यातील पहिले कॅशलेस रेल्वेस्टेशन ठरले असून, याठिकाणी आता वायफाय सुविधाही देण्यात येत आहे. अगदी सहजपणे त्याचा वापर करता येतो. ३७ लाख रुपयांच्या निधीतून रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक- २ व ३ वर शेड उभारण्यात आले आहे. मुकुंदवाडी स्टेशनवर आरक्षण प्रणाली सुरू झाली आहे. या सुविधेसह प्रवाशांनी आॅनलाईन पद्धतीनेही तिकीट आरक्षण करण्यास प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम, वाहतूक निरीक्षक लक्ष्मीकांत जाकडे, धनंजयकुमार सिंह, आशुतोष गुप्ता, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी. डी. कांबळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे आदी उपस्थित होते.
डेमूसाठी तीन प्रस्ताव
जालना-नगरसोल डेमू रेल्वेचा मनमाडपर्यंत विस्तार करण्याची मागणी होती. त्याचबरोबर नाशिक, इगतपुरी आणि शिर्डी असेही प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आले होते. यामध्ये ही रेल्वे शिर्डीपर्यंत नेण्यास मान्यता देण्यात आली. ही रेल्वे मनमाडलाही जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सुविधा झाल्याचे डॉ. ए. के. सिन्हा म्हणाले.