‘जलपरी’ने धाडले चार कोटींचे बिल! लातूरला मोफत पाणी देण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली
By admin | Published: May 13, 2016 04:10 AM2016-05-13T04:10:49+5:302016-05-13T08:17:06+5:30
मिरजेतून लातूरला आतापर्यंत पोहोचविण्यात आलेल्या सहा कोटी २० लाख लिटर पाण्यासाठी रेल्वेन तब्बल चार कोटी रुपयांचे बिल आकारले असून त्यापैकी ४ मे पर्यंतचे २ कोटी ४ लाखांचे बिल तात्काळ अदा करावे
लातूर : मिरजेतून लातूरला आतापर्यंत पोहोचविण्यात आलेल्या सहा कोटी २० लाख लिटर पाण्यासाठी रेल्वेन तब्बल चार कोटी रुपयांचे बिल आकारले असून त्यापैकी ४ मे पर्यंतचे २ कोटी ४ लाखांचे बिल तात्काळ अदा करावे, असे पत्र सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. या पत्रामुळे लातूरला रेल्वेने मोफत पाणी देण्याची रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा हवेतच विरली.
लातूरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर तातडीचा उपाय म्हणून १२ एप्रिलपासून दररोज मिरजेहून ५० रेल्वे वॅगनद्वारे २५ लाख लिटर पाणी पुरवले जात आहे. १२ मे पर्यंत ६ कोटी २० लाख लिटर पाणी आणण्यात आले आहे. यासाठी रेल्वेला दररोज १२.५० लाख रुपये खर्च येत आहे. मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात या खर्चाचा उल्लेख आहे. लातूरला रेल्वेने मोफत पाणी देण्याची घोषणा रेल्वेमंत्री प्रभुंनी केली होती. या घोषणेचे स्वागत करत स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी पहिल्याच दिवशी जलपरीवर बॅनर लावून रेल्वेमंत्र्यांचे अभिनंदन केले होते.
>जिल्हाधिकारी म्हणतात
२ कोटी ४ लक्ष रुपयांचे बिल रेल्वे विभागाकडून बुधवारी आले असून राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे या बिलाच्या देयकासंदर्भात मागणी केली आहे, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी लोकमतला सांगितले.