Jammu & Kashmir: कोल्हापूरच्या जावयानेच सोडवला काश्मीर प्रश्न; सोशल मीडियावर मेसेज व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:42 AM2019-08-06T04:42:36+5:302019-08-06T06:31:30+5:30
रेड फॉर काश्मीर हॅशटॅगने काहींचा निर्णयाला विरोध
मुंबई : ‘शेवटी काश्मीर प्रश्न कोल्हापूरच्या जावयानेच सोडवला, दाजी विषय हार्ड’, ‘जे मोदींना ६० महिन्यांत जमले नाही, ते शहांनी ६० दिवसांत करून दाखवले’, इथपासून ‘काश्मिरात दल लेकसमोर टू बीएचके, थ्री बीएचके फ्लॅटचे बुकिंग सुरू’, ‘रणजी सामन्यांसाठी आणखी एक संघ मिळाला...’ असे एकाहून एक भन्नाट मेसेज, फोटो मेसेजनी सोमवारी धमाल उडवून दिली. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर सकाळी ११ वाजल्यापासून काश्मीरशी संबंधित मेसेजचा पूरच आला.
अमरनाथ यात्रा थांबवून सर्व पर्यटकांना राज्याबाहेर पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हाच काश्मिरात काही तरी घडणार अशी चर्चा सुरू झाली. रविवारी सायंकाळपर्यंत टिष्ट्वटरवर काश्मीरचा मुद्दा ट्रेंडिंगवर आला. सोमवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी विभाजनासह कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडताच सर्वच माध्यमांत चर्चेला ऊत आले. ‘काश्मीर पर फायनल फाइट’, ‘जम्मू अॅण्ड काश्मीर, वन कंट्री वन सिस्टीम’, ‘ऑपरेशन काश्मीर’, ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अशा हॅशटॅगने टिष्ट्वटरवर लक्ष वेधण्यात येत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कौतुकाच्या मेसेजेसनाही विनोदाची झालर होती. सरकारच्या अभिनंदनासोबतच विरोधातही मेसेजिंग सुरू होते. ‘रेड फॉर काश्मीर हॅशटॅग’ने काही लोकांनी या निर्णयाचा विरोध केला. व्हॉट्सअॅपचा डीपी लाल ठेवण्याची मोहीमही उघडण्यात आली. तिकडे पाकिस्तानी कलाकारांनीही या मुद्द्यावर नाक खुपसत टीकाटिप्पणी केली. ‘स्टँड विथ काश्मीर’, ‘काश्मीर अंडर थ्रेट’, ‘काश्मीर ब्लीड्स’ असे हॅशटॅग पाकिस्तानी कलाकार वापरत होते. वीणा मलिक, माहिरा खान वगैरे कलाकारांनी टिष्ट्वट केले. यावर भारतीय पाठिराख्यांनी त्यांना चांगलेच खडसावले.