Jammu & Kashmir: 'या' मराठमोळ्या व्यक्तीनं कलम ३७०ला दिलं होतं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:08 AM2019-08-06T04:08:15+5:302019-08-06T06:32:17+5:30
वी द सिटिझन; दिवंगत संदीप कुलकर्णी यांच्या लढ्याला यश
- धनंजय वाखारे
नाशिक : काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलमाला थेट सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देत वाचा फोडणारी व्यक्ती मूळ नाशिककर होती. नाशिकच्या संदीप कुलकर्णी यांनी नवी दिल्लीत असताना स्थापन केलेल्या ‘वी द सिटिझन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत न्यायालयात जनहित याचिका दाखल करत सर्वप्रथम या लढ्याला तोंड फोडले. मोदी सरकारने सोमवारी घेतलेल्या या निर्णयामुळे कुलकर्णी यांच्या पश्चात त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू ठेवलेल्या लढ्याला यश आले आहे.
ऑगस्ट २०१४ मध्ये सर्वप्रथम ‘वी द सिटिझन’ या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. संस्थेच्या संस्थापकांपैकी एक सदस्य होते नाशिकचे संदीप रमेश कुलकर्णी. कुलकर्णी यांच्यासमवेत प्रख्यात पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनीदेखील याचिकाकर्ता म्हणून सहभाग नोंदविला. डिसेंबर २०१६ मध्ये संदीप कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पुष्पेंद्र व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुलकर्णी यांनी सुरू केलेली लढाई पुढे चालू ठेवली. आता मोदी सरकारने दोन्ही कलम हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर एका नाशिककराने उभारलेल्या लढाईला यश आल्याची भावना बोलून दाखविली जात आहे.
संदीप कुलकर्णी या मूळ नाशिककराने या वादग्रस्त कलमांविरुद्ध आवाज उठविला होता. ही कलमे हटवत मोदी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कुलकर्णी यांना खऱ्या अर्थाने ती श्रद्धांजलीच म्हणावी लागेल. संदीप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आमच्याच शाखेत कार्यरत होता.
- प्रकाश दीक्षित, स्वयंसेवक, आरएसएस