जनांजवळचे जनकवी

By admin | Published: July 2, 2017 05:48 AM2017-07-02T05:48:47+5:302017-07-02T05:48:47+5:30

ठाण्याच्या मातीशी त्यांची ‘वीण’ म्हणजे ‘नाळ’ एवढी घट्ट होती की, ते ठाण्याच्या बाहेर कुठेही रहायला तयार नव्हते. कलावंतांच्या कोट्यातून

Janakvav | जनांजवळचे जनकवी

जनांजवळचे जनकवी

Next

- संजय पाटील

ठाण्याच्या मातीशी त्यांची ‘वीण’ म्हणजे ‘नाळ’ एवढी घट्ट होती की, ते ठाण्याच्या बाहेर कुठेही रहायला तयार नव्हते. कलावंतांच्या कोट्यातून तसेच हौसिंग बोर्डाचे सभासद असताना त्यांना सदनिका मिळवणे अगदी सहज शक्य होते; परंतु त्यांनी तसे केले नाही. एकदा का माणूस ठाण्यात आला की तो ‘ठाण’ मांडून बसतो, असे ते नेहमी म्हणत आणि त्यांनी आपल्या कृतीने करून दाखवले. ठाणेकरांनीसुद्धा त्यांना ‘नगराध्यक्ष’पदी विराजमान करून त्यांचा यथोचित सन्मान केला.

दादांना सहा भाऊ आणि दोन बहिणी. दादा सर्वांत थोरले, त्यांचे वडील आबासाहेब वारकरी पंथाचे होते. गळ्यात तुळशीची माळ व लांब पांढरी शुभ्र दाढी, पंढरीची वारी त्यांनी शेवटपर्यंत केली. दादांची आई भागीरथी ही जात्यावर, शेतात काम करताना अभंग, ओव्या, भजन करीत गुणगुणत. दुर्दैवाने तिचे गुणगुणणे, त्या काळी कुणी लिहून ठेवले नाही. नाहीतर बहिणाबाईनंतर भागीरथीबाईसुद्धा प्रकाशात आली असती. ती दादांची पहिली गुरू होय.
दादांचे सातवीपर्यंत शिक्षण गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आले. कोल्हापूर येथे एका परिटाने त्यांची राहण्याची व शिक्षणाची आणि जेवणाची सोय केली. पुढील महाविद्यालयीन शिक्षण दादासाहेब निंबाळकर महाराज यांनी केले. दादासाहेबांचे ते मानसपुत्र होते. राजाराम कॉलेजमधून शिक्षण घेऊन मुंबई विद्यापीठातून १९४३ साली बी.ए. झाले.
कॉलेज जीवनात त्यांना दुसरे गुरू मिळाले, ते म्हणजे माधव ज्युलीयन. ते दादांना सतत लिहित जा, प्रसिद्धीची अपेक्षा करू नकोस. सतत लिहिण्याचे काव्यात प्रगल्भता येते, असे त्यांना उपदेश करत.
दादांनी संगीतकार वसंत प्रभू यांच्या मिसेसचे नाव वर्षा आणि मुलांची नावे हेमंत व शरद, ऋतूप्रमाणे ठेवली. दादांनी आपल्या मुलींची नावे प्रतिभा व कल्पना आपल्या काव्याला स्फूर्ती देणारी ठेवली. माझ्या मुलाची नावे ‘ओंकार व संपदा’ त्यांनी ठेवली, तर माझ्या पत्नीचे नाव गीता हेसुद्धा त्यांनीच सुचविले होते. संजय आणि गीता हे महाभारतातील संबंधित नावे त्यांच्या कवी कल्पनेची उत्तुंग भरारीची जाणीव करून देते. दादांनी वरील सर्व जणांचे नामकरण केले; पण माझे नाव संजय हे मात्र आशा भोसले यांनी ठेवले.
माझा मुलगा ओंकार याला शाळेत घालायचे होते. इंग्रजी व मराठी माध्यमावरून आमच्या दोघांत चर्चा चालू असताना दादा आले आणि त्यांनी आमची चर्चा सांगितली. दादांनी आम्ही विचारले की, ओंकारला कुठल्या माध्यमात घालू? दादांनी चटकन उत्तरे दिले. ‘तुला त्याला ज्ञानेश्वर करायचे की, येशू ख्रिस्त करायचे ते तू ठरव.’ एवढ्या समर्पक उत्तरांत दादांनी दोन्ही माध्यमातील फरक आम्हाला करून दिला. आम्ही ओंकारला ज्ञानेश्वर केले तसेच माझी मुलगी संपदा हिलासुद्धा मराठी माध्यमांत शिकवले.
दादा दर पंधरा-वीस दिवसांनी एखादी मुलाखत द्यायचे. एकदा आमच्या घरी एका मुलाखतकाराने दादांना एक प्रश्न विचारला, ‘दादा तुम्ही एका नावेमध्ये बसला आहात. नावेमध्ये तुमची सर्व गीते आहेत. अचानक एकदम वादळ आले आणि नावाड्यानी तुम्हाला सांगितले की, आपला प्राण वाचवण्यासाठी या नावेतलं एक आवडतं गीत घ्या आणि आपला प्राण वाचवा, तर तुम्ही कुठले आवडते गीत घेऊन आपले प्राण वाचवाल. दादांनी डोळे मोठे करून ‘अरेच्या’ म्हणत ओठातल्या ओठात हसत म्हणाले, (ही त्यांची एक खासियत होती, त्यांच्या शब्दांत सांगतो.) ‘ही सर्व गीते माझा प्राण आहेत. या गीतांवर मी प्राणापलीकडे प्रेम केले आहे. त्यांचे प्राण देऊन मी माझे प्राण वाचवणे हे मला सहन होणार नाही, म्हणून मी गीतांच्या प्राणावर माझ्या प्राणांचे बलिदान करीन.’ हे ऐकून त्या मुलाखतकाराला टाळीसाठी हात पुढे केला. (हीसुद्धा त्यांची खासियत होती.)
कविता आणि गीत याबद्दल फरक सांगताना दादा एकदम सोपे उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, ‘माते मला भोजन दे, ही कविता झाली; तर आई मला वाढ, हे गीत झाले. कविता पानांत असते तर गीत मनांत असते, जे मनातून हृदयात उतरते आणि कायमचे स्थान करून राहते.’
दादांच्या बऱ्याच गाण्यांच्या चाली आमच्या घरी तयार केल्या आहेत आणि त्या यशस्वी होण्यामागे आमच्या आईच्या सहभाग होता, हे नाकारून चालणार नाही. कारण एकदा निर्माण झालेले वातावरण मोडायचे नाही, असा शिरस्ता होता.
आता मी राहतो त्या घरी संगीतबद्ध केलेले एक अजरामर गीत म्हणजे ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई.’ स्त्रीला अनंत काळाची माता बनविणारे, तीच माता बाळाची उतराई कशी करू असा प्रश्न बाळाला करते. स्त्रीचे एक आईचे उदात्त विचार या गीतातून प्रकट होतात. या गीताबद्दल संगीतकार यशवंत देव ‘शब्दप्रधान गायकी’ या पुस्तकात म्हणाले होते की, ‘वसंत प्रभूंनी तुझ्या या शब्दावर जोर देऊन गाऊन घ्यायला पाहिजे होते.’ याविषयी दादांना एक मुलाखतकाराने त्यांची प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्यावर दादा मिश्किलपणे म्हणाले, ‘दोघेही महान संगीतकार आहेत. त्यांच्यामधील वाद हा ‘देव आणि प्रभू’मधील आहे. त्यामध्ये आपण सामान्य माणसाने का पडावे? १९४४ साली ठाण्यात आलेले दादा शेवटपर्यंत म्हणजे १९९७ पर्यंत सतत ५३ वर्षे ठाण्यात वास्तव्यास होते. या काळात त्यांना अनेक खाजगी (सरकारी नव्हे) पुरस्कार मिळाले. मानमरातब पदे मिळाली. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते. त्या काळी महाविद्यालयीन शिक्षणासाठी ठाण्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मुंबईला जावे लागे. यासाठी ठाण्यात जर कॉलेज काढले तर त्यांचा वेळ व श्रम वाचेल, या उदात्त हेतूने ठाण्यात कॉलेज स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांनी कॉलेजसाठी १० एकर जागा मोफत मिळवून दिली (ते पत्रसुद्धा माझ्या संग्रही आहे.) ज्ञानसाधना महाविद्यालय स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ठाणे नगरपालिकेत १९६४ साली शिक्षण समितीचे सभापती असताना सर्व शिक्षकांचा पगार रुपये ४० वरून रुपये १०० केला होता. (त्या काळी) अजूनही शिक्षक-शिक्षिका याची आठवण सांगतात.
दादा रुढार्थाने व्यवहारापासून दूर होते, पण जनांच्या जवळ होते. दादांशी बोलायला वयोमनाचे बंधन नव्हते, ते लहान मुलांपासून, विद्यार्थी, तरुण, समवयस्क, ज्येष्ठ अगदी सगळ्यांशी तन्मयतेने बोलत, वागत असत. अहंकाराच्या काठीला कोपऱ्यात ठेवल्याप्रमाणे त्यांच्यात विनयशीलता होती. जनांसाठी, जनांकरिता, जनांच्या व्यथा ते आपल्या काव्यातून मांडत असत. जनांचे सोपे शब्द आपल्या काव्यशैलीत मांडत असत. तीच त्यांची प्रतिभा होती आणि म्हणूनच ते जनकवी होते.

Web Title: Janakvav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.