जान्हवीला २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
By admin | Published: June 13, 2015 03:25 AM2015-06-13T03:25:03+5:302015-06-13T03:25:03+5:30
मद्यधुंद अवस्थेत उलट्या दिशेने गाडी चालवत एका टॅक्सीला उडवून दोघा जणांचा बळी घेणाऱ्या जान्हवी गडकरला शुक्रवारी कुर्ला न्यायालयाने
मुंबई : मद्यधुंद अवस्थेत उलट्या दिशेने गाडी चालवत एका टॅक्सीला उडवून दोघा जणांचा बळी घेणाऱ्या जान्हवी गडकरला शुक्रवारी कुर्ला न्यायालयाने २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दंडाधिकारी ऋचा खेडेकर यांनी हा निकाल दिला.
न्यायालयीन कोठडीत येताच जान्हवीचे वकील अॅड. महेश सबनीस यांनी जामीन अर्ज सादर केला. त्यावर तपास अधिकारी व सरकारी वकिलांनी म्हणणे मांडण्याचे आदेश देत दंडाधिकारी खेडेकर यांनी या प्रकरणाची सुनावणी १५ जूनपर्यंत तहकूब केली. जामीन मिळेपर्यंत जान्हवीची रवानगी भायखळा येथील महिला कारागृहात करण्यात आली आहे. येथे विविध गुन्हयात सहभागी असलेल्या महिला गुन्हेगारांसोबत तिला राहावे लागेल.
जान्हवीची रडारड
आरसीएफ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास जान्हवीला न्यायालयात आणले. यावेळी तिला पाहाण्यासाठी बरीच गर्दी न्यायालयाच्या आवारात होती. पोलिसांच्या गाडीभोवती या गर्दीने वेढा दिला. त्यात जान्हवीचे फूटेज, फोटो माध्यम प्रतिनिधींनीही परिसर डोक्यावर घेतला. व्हरांडयातून न्यायालयात येईपर्यंत या गर्दीने जान्हवीची पाठ धरली. कुतुहलापोटी दंडाधिकारी खेडेकर यांचे न्यायदालन हाऊसफुल्ल होते. हा सर्व प्रकार पाहून जान्हवीला रडू फुटले. सरकारी वकील अॅड. महाजन यांनी सुरूवातीलाच जान्हवीची पोलीस कोठडी वाढवावी ही विनंती करताच जान्हवी ओक्साबोक्शी रडू लागली. तिचे वकील अॅड. सबनीस यांनी तपासासाठी पोलिसांना पुरेसा अवधी मिळाला आहे. ती कुठून निघाली, अपघात कुठे घडला ही सर्व माहिती पोलिसांनी मिळवली आहे. जान्हवीही या अपघातात जखमी झाली असून तिला पोलिसांपेक्षा कुटुंबाकडून चांगल्या दर्जाचे उपचार मिळू शकतील, असा युक्तिवाद केला.