भंवरलाल जैन यांच्या अंत्यदर्शनाला जनसागर
By Admin | Published: February 27, 2016 02:08 AM2016-02-27T02:08:46+5:302016-02-27T02:08:46+5:30
ठिबक सिंचनाची क्रांती घडविणारे, लाखो कुटुंबांचे पोशिंदा तथा जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत भंवरलाल जैन यांच्या अंत्यदर्शनासाठी शुक्रवारी सकाळपासूनच
जळगाव : ठिबक सिंचनाची क्रांती घडविणारे, लाखो कुटुंबांचे पोशिंदा तथा जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत भंवरलाल जैन यांच्या अंत्यदर्शनासाठी शुक्रवारी सकाळपासूनच देश-विदेशातील आप्तस्वकीयांची रीघ लागली होती. मुंबईतील जसलोक इस्पितळामध्ये गुरुवारी दुपारी त्यांचे निधन झाले. भाऊंच्या निधनाने शोकसागरात बुडालेल्या जळगावकरांसह मान्यवरांची पावले आपल्या लाडक्या कर्मयोग्याच्या अंत्यदर्शनासाठी जैन हिल्सकडे वळली. त्यात भाऊंच्या कामाचा केंद्रबिंदू असलेले शेतकरी, कष्टकरी यांचाही समावेश होता. (प्रतिनिधी)
आज अंत्यसंस्कार
जैन यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत पुन्हा अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजेंद्र दर्डा यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन
लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चिफ राजेंद्र दर्डा यांनी भंवरलाल जैन यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करीत अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अशोक जैन यांच्यासह जैन कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कवी ना. धों. महानोर, डॉ. सुभाष चौधरी यांचीही भेट घेऊन भाऊंबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
भंवरलाल जैन यांनी पर्यावरण रक्षणासाठी जे काम केले ते पाहून समाधान वाटले. जमिनीप्रमाणे त्यांनी टेकड्याही हिरव्यागार केल्या. जैन इरिगेशन व भंवरलाल जैन यांचे काम पाहून शेतकरी, शेतीसाठी सकारात्मक प्रयत्न निश्चितच करता येतील.
- मनेका गांधी, केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री
भंवरलाल जैन यांचे मोठे लोभस दर्शन त्यांचे काम, उपक्रम, योगदान यातून घडते. ते विज्ञानवादी, जिज्ञासू होते, तरी त्यांनी माणसं सांभाळण्याचे काम केले. त्यांच्यातील प्रेमळ माणसाची जाणीव पदोपदी झाली. त्यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहणारे असेच आहे.
- अरुण फिरोदिया, अध्यक्ष,
कायनेटीक इंजिनीअरिंग लि., पुणे
भंवरलाल जैन हे समर्पित असे व्यक्तिमत्त्व आहे. निसर्गाशी नाते सांगणारे त्यांचे काम आहे. त्यांचे शेती, मातीच्या विषयांचे लेखन, शेतीसाठीचे काम प्रेरणादायी आहे.
- डॉ. विकास आमटे, ज्येष्ठ समाजसेवक
भंवरलाल जैन यांच्याबाबत जे साहित्य, लेखन आहे ते त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय घडविणारे असेच आहे. त्यांचे शेती, पर्यावरण क्षेत्रातील काम मोठे आहे. त्यांचे बहुआयामी, सद्गुणी चरित्र पुढच्या पिढ्यांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शक राहील.
- भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक
भाऊ म्हणजे निर्मळ, निगर्वी, शानदार, शालिन असं व्यक्तिमत्त्व. त्यांचं जीवनच एक पुस्तक आहे, एक ग्रंथ आहे, एक संदेश आहे.
- अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष
भंवरलाल भाऊ म्हणजेच मोठे भाऊ यांनी शेती, मातीशी निगडित प्रश्न सोडविण्याचेच काम केले. गरीब शेतकरी, बळवंत शेतकरी याला समृद्ध करण्याचं काम करणारे भाऊ होते. शेतकऱ्यांना परवडेल, असा प्लॅस्टिक पाइप त्यांनी तयार केला. कुणी काही म्हणत असले तरी हरित क्रांती जर झाली असेल तर ती पीव्हीसी पाइपमुळे.
- ना. धों. महानोर, प्रख्यात कवी
माणसं जोडणं हा भाऊंचा पैलू होता. कोणत्याही माणसाला अचूक ओळखण्याची त्यांची क्षमता दांडगी होती. एकदा जोडलेली माणसे भाऊ आयुष्यभराकरिता कायमची जपत. - दलूभाऊ जैन, ज्येष्ठ समाजसेवक