जपानी पिकांची होणार महाराष्ट्राच्या मातीत लागवड; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 11:58 AM2020-11-12T11:58:17+5:302020-11-12T14:47:59+5:30
जपानी कृषितंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी बारामतीत बैठक
बारामती : दिवसेंदिवस बदलणाऱ्या हवामानामुळे देशातील पिके,पिकांना मिळणाऱ्या बाजारपेठेवर विपरीत परीणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक क्षमता अधिक असणाऱ्या ,कमी पाण्यावर उगवणाऱ्या द्राक्ष,ऊस,संत्रा सारख्या जपानी पिकांची महाराष्ट्रात लागवड करण्यासाठी पहिले पाऊल पडले आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकारातुन जपानच्या कृषितज्ञांसमवेत बारामतीत आज याबाबत पहिली बैठक पार पडली. येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट लवकरच त्यासाठी कृषि आराखडा तयार करणार आहे.त्यामुळे आपल्या मातीत जपानी कृषि आणि यांत्रिकीकरणाचे संशोधन रुजण्याचे संकेत आहेत. येथील कृषि विज्ञान केंद्रात पवार यांच्यासह द्राक्ष बागायतदार
संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह,काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमवेत जपानचे मिशीहो हाराडा यांची बुधवारी(दि ११) बैठक पारपडली. यावेळी कृषी विज्ञान केंद्रात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारीनिलेश नलावडे,प्रमुख शास्त्रज्ञ डॉ रतन जाधव,सल्लागार डॉ. संतोष भोसले, विवेक भोईटे ,डॉ मिलींद जोशी आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निमंत्रणावरुन मिशीहो बारामतीत आले होते. सकाळी त्यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला भेट देत येथील कृृषि संशोधनासह प्रयोगाची पाहणी केली. त्या नंतर पार पडलेल्या बैठकीत महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मिशिहो म्हणाले, जपानमधील ओसाका ते हिरोशीमा या पट्ट्यात द्राक्षाची उत्तम शेती केलीजाते. जपानमध्ये द्राक्षाला भावही चांगला मिळतो. शरद पवार यांच्याशी पुर्वी झालेल्या भेटीत त्यांना ही बाब सांगितली.यावेळी पवार यांनीदिलेल्या आमंत्रणावरुन आज येथे भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.या शिवाय कृषी क्षेत्रात जपान सरकारच्या मदतीने काही स्टार्ट अप सुरु करण्याबाबतची चर्चा बैठकीत करण्यात आली.
जपानमध्ये द्राक्षासह संत्रा,मोसंबी,ऊस या पिकांची लागवड होते. ही पिके रोगाला कमी प्रमाणात बळी पडणारी आहेत.कमी पाण्यावर अधिक दर्जेदार उत्पादन देण्यासाठी जपानी कृषि तंत्रज्ञान नावाजलेले आहे.शिवाय जपान संपुर्ण जगात तंत्रज्ञानासाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे जपानच्या कृषी आणि यांत्रिकीकरणाचे तंत्रज्ञान महाराष्ट्राच्या मातीत रुजविण्याबाबत एैतिहासिक चर्चा यावेळी झाली.येथील कृषि विज्ञान केंद्रात इस्त्राईल,नेदरलँडच्या प्रगत संशोधनाचा अवलंब करण्यात यशस्वी प्रयोग झाले आहेत.आता जपानी तंत्रज्ञानाचा यशस्वी अवलंब करण्यास महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.
विषमुक्त पिकांची संकल्पना रूजण्यास ‘साहेबांचा’ पुढाकार
भारतात द्राक्षावर भुरी,डावण्यासारखे रोग पडतात.त्यासाठी द्राक्षबागांवर मोठी औषध फवारणी होते. मात्र, जपान १९६० पासुन सेंद्रीय शेती करतो.तिथे औषध फवारणी केली जात नाही.जपानमध्ये मस्कत ही उत्तम प्रतीची द्राक्ष मानली जातात.या द्राक्षाला जपानमध्ये कमाल पाच हजार प्रति किलो दर मिळतो. अगदी तिसऱ्या ग्रेडच्या द्राक्षाला देखील ३ हजारापेक्षा अधिक दर मिळतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मातीत विषमुक्त द्राक्षासह विविध रसायनमुक्त पिकांची संकल्पना रुजण्यास मोठी मदत मिळणार आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा त्यासाठी घेतलेला पुढाकार भारतीय कृषिक्षेत्राला दिशा देणारा ठरणार असल्याचे संकेत आहेत. बारामती इंदापूर तालुक्यातील द्राक्ष बागांचे प्रमाण अधिक आहे. जपानी द्राक्ष या मातीत रुजल्यास येथील शेतीप्रयोग जगभरात प्रसिध्द होतील.
————