जात पंचायतीने महिलेला, दिली थुंकी चाटण्याची शिक्षा? नीलम गोऱ्हे यांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:15 AM2021-05-13T08:15:08+5:302021-05-13T08:15:50+5:30
पीडित महिलेने वडगाव येथील एका व्यक्तीसोबत २०११ साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. परंतु, जात पंचायतच्या पंचांना तो मान्य नव्हता.
निहिदा : पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतचे महत्त्व कायम आहे. जात पंचायती कायद्याला जुमानत नसल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव येथे ९ एप्रिल रोजी घडली. पहिल्या पतीशी कायदेशीर फारकत घेत महिलेने केलेले दुसरे लग्न अमान्य करीत, तिला जात पंचायतने एक लाख रुपयांच्या दंडासह पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा सुनावल्याचा प्रकार विधान परिषदेच्या उपसभापती आ. नीलम गोऱ्हे यांच्या पत्रामुळे बुधवारी उघडकीस आला. परंतु, जात पंचायतच्या सदस्यांसह महिलेच्या नातेवाइकांनी असा प्रकार घडलाच नसल्याचे स्पष्ट केले.
पीडित महिलेने वडगाव येथील एका व्यक्तीसोबत २०११ साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. परंतु, जात पंचायतच्या पंचांना तो मान्य नव्हता. दरम्यान, पीडित महिलेने २०१९ मध्ये एका घटस्फोटित व्यक्तीशी पुनर्विवाह केला. हा पुनर्विवाहसुद्धा पंचांनी अमान्य करीत, जात पंचायतीने तिला एक लाख रुपयांचा दंड केला. महाराष्ट्रातील पंच एकत्र येऊन न्यायनिवाडा करीत, पीडित महिलेला व तिच्या परिवारास जात बहिष्कृत केले. पीडित महिलेने पहिल्या पतीसोबत राहावे, असा निर्णय पंचांनी दिला. एवढेच नाहीतर पंचांनी केळीच्या पानावर थुंकून, ती थुंकी चाटण्याची अजब शिक्षा ९ एप्रिल रोजी पीडित महिलेला दिली. या प्रकरणाची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना मिळाल्यावर, त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून, कारवाई करण्याची मागणी केली. ही घटना उघड झाल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. परंतु, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वडगावात असा प्रकार घडला नसल्याचे समोर आले.
‘शिक्षा दिलीच नाही’
पोलीस गावात पोहोचल्यावर, सर्व प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. ग्रामस्थांनीसुद्धा महिलेला जात पंचायतच्या पंचांनी अशी कोणतीही शिक्षा केली नसल्याचे पोलिसांना निक्षून सांगितले. घटनेबाबत फारसे कोणी बाेलण्यास तयार नसल्याचे पोलीस चौकशीत दिसून आले.
एक महिन्यापूर्वी जात पंचायत भरली होती. मात्र, त्यामध्ये थुंकी चाटण्याची शिक्षा सुनावली नाही. जात पंचायतने तिला कोणतीही शिक्षा दिली नाही.
- वंदना शेगर, पीडितेची बहीण
जात पंचायत भरली की नाही, हे माहीत नाही. परंतु, थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याचा प्रकार घडला नाही, असा जबाब आम्ही पिंजर पोलिसांकडे नोंदविला आहे.
- संजय निळखन, पोलीस पाटील