जातीविरहित धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र हवा
By admin | Published: October 5, 2015 01:22 AM2015-10-05T01:22:44+5:302015-10-05T01:22:44+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या खून करणाऱ्या शक्ती कोणत्या, त्याच.. ज्यांना जात, धर्म, लिंग यांत समान अधिकार असलेले आधुनिक राष्ट्र म्हणून आपला समाज पुढे जाणे पटत नाही
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या खून करणाऱ्या शक्ती कोणत्या, त्याच.. ज्यांना जात, धर्म, लिंग यांत समान अधिकार असलेले आधुनिक राष्ट्र म्हणून आपला समाज पुढे जाणे पटत नाही, अशा शक्तीचा संपूर्ण समाजाने नाश करायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरून जातीविरहित धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी चांगल्या विचारांची पेरणी करायला पाहिजे, असे मत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी रविवारी व्यक्त केले.
डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन आॅफ इंडिया महाराष्ट्र राज्य कमिटी यांच्या वतीने डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा संघर्ष संदेश जथ्याची सुरुवात महर्षी शिंदे पुलावरून रविवारी करण्यात आली़ त्या वेळी पेठे बोलत होते. या वेळी जथ्याचे स्वागताध्यक्ष व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे क ार्याध्यक्ष अविनाश पाटील, डीवायएफआयचे व जथ्याचे राज्याध्यक्ष अॅड. भगवान भोजने, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आदी उपस्थित होते.
या जथ्याची सुरुवात रविवारी पुण्यातून झाली़ ती कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली आहे. पुढे हा जथा रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये जाऊन नंतर औरंगाबादला पोहोचेल. कोल्हापूरमध्ये कॉ. पानसरेंवर झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणाहून निघणारा जथा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांचा दौरा करून औरंगाबादमध्ये प्रवेश करणार आहे. (प्रतिनिधी)