जावयाला दोन वर्षे कारावासाची शिक्षा
By Admin | Published: September 24, 2016 01:22 AM2016-09-24T01:22:59+5:302016-09-24T01:22:59+5:30
जावयाला राजगुरुनगर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. डी. देशिंगे यांनी आज दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
राजगुरुनगर : आळंदीजवळील चऱ्होली खुर्द येथील आपल्या सासुरवाडीत राडा करणाऱ्या जावयाला राजगुरुनगर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. डी. देशिंगे यांनी आज दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
पंडित जयवंत इंगळे (वय ४०, रा. शिवळेवस्ती, तुळापूर, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्या जावयाचे नाव आहे. नवऱ्याच्या घरी वारंवार वादविवाद आणि भांडणे होत असल्याने पत्नी माहेरी राहायला आली होती. आरोपी इंगळे आपल्या पत्नीला त्याच्या घरी घेऊन जाणयासाठी सासुरवाडी चऱ्होली येथे ३ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ८.३० वाजता गेला आणि जबरदस्तीने घरात घुसला. पत्नीला आपल्याकडे पाठवीत नाही, म्हणून सासरच्यांना त्याने दमबाजी आणि शिवीगाळ करीत राडा सुरू केला. त्या वेळी सासू आणि मेहुण्याच्या पत्नीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या होत्या. त्याच्या मेहुण्याच्या पत्नीने म्हणजे पत्नीच्या भावजयीने पोलिसांत तक्रार दिली होती.
आरोपी इंगळेला २ वर्षे कारावासाची आणि १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिना कारावास, अशी शिक्षा सुनावली. तसेच, ६ महिने साधा कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास आणि १ वर्ष सक्त कारावास व १,००० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशीही शिक्षा दिली. त्याने एकत्रित भोगण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. डी. देशिंगे यांनी आज आरोपी इंगळेला कलम ४५२ नुसार २ वर्षे कारावासाची आणि १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिना कारावास, अशी शिक्षा सुनावली. तसेच, कलम ४२७ अंतर्गत ६ महिने साधा कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास आणि कलम ५०४अंतर्गत १ वर्ष सक्त कारावास व १,००० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशीही शिक्षा दिली. या सर्व शिक्षा त्याने एकत्रित भोगण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, दंडाची २,५०० रुपये रक्कम फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.