आमच्या शब्दाचा मान राखला, शरद पवारांच्या निकटवर्तीय मित्राने व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 10:42 AM2023-05-06T10:42:08+5:302023-05-06T10:42:29+5:30
शरद पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल.
बारामती (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर बारामतीकरांमध्ये दाटलेली अस्वस्थता दूर होण्यास सुरुवात झाली. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘अध्यक्षां’च्या निर्णयाचे उत्साहात स्वागत केले आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल. तर आमच्या शब्दाचा मान शरद पवार यांनी राखला अशी भावना पवारांचे १९६७ च्या निवडणुकीपासूनचे निकटचे मित्र असणारे माजी नगराध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष वनिता बनकर म्हणाल्या, साहेबांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाची केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर सर्वांनाच गरज आहे.
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आणि पवार यांचे जुने सहकारी सुभाष ढोले यांनी सांगितले की, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता शरद पवार यांच्याशिवाय अन्य कोणाच्यातही नाही. त्यांच्या निर्णयाचा आम्हा सर्वांना आनंद आहे.
...या माणसाचा रुबाब आजही कायम
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर समर्थक, काही नेते राजीनामा मागे घेण्यासाठी अडून बसले. देशभरातून राहुल गांधी, स्टॅलिन, ममतांसारख्या नेत्यांचे फोन येऊन गेले. सत्ता असो, वा नसो. या माणसाचा रुबाब आजही कायम आहे. ही पवार यांचे राजकीय महत्त्व अधोरेखित करणारी पोस्ट सोशल मीडियावर सर्वाधिक ‘व्हायरल’ झाल्याचे चित्र होते.