जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह
By Admin | Published: November 20, 2014 01:05 AM2014-11-20T01:05:44+5:302014-11-20T01:05:44+5:30
स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या स्मृती समारोहानिमित्त यवतमाळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
यवतमाळ : स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या स्मृती समारोहानिमित्त यवतमाळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी बाबूजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रेरणास्थळ येथे उपस्थित राहणार आहेत. तर, २४ नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध सितार वादक बुद्धदित्य मुखर्जी आणि प्रसिद्ध तबला वादक सौमेन नंदी यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच यवतमाळात येत आहेत. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.४५ वाजता जवाहरलाल दर्डा विमानतळावर त्यांचे आगमन होईल. ८ वाजता दर्डा उद्यान येथे पोहोचतील. त्याठिकाणी सखी मंचच्या अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांचे स्मृतिस्थळ असलेल्या ‘शक्तिस्थळा’ला भेट देऊन आदरांजली अर्पण करतील. त्यानंतर सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री ‘प्रेरणास्थळा’वर बाबूजींना आदरांजली अर्पण करतील. याच ठिकाणी ते आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ८ ते ९ या वेळात संगीतमय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यात यवतमाळातील प्रथितयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना आदरांजली अर्पण करतील.
२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रेरणास्थळावर संगीतमय संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध सितार आणि सूरबहार वादक बुद्धदित्य मुखर्जी आणि प्रसिद्ध तबलावादक सौमेन नंदी यांची मैफल होणार आहे.
यवतमाळ पब्लिक स्कूलच्यावतीने ‘यवतमाळ प्रीमीअर लिग-२०१४’ ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ९ नोव्हेंबर रोजी पोस्टल मैदानावर पार पडले. १२ शाळांतील निवडक संघ यात सहभागी झाले असून स्पर्धेचा समारोप २३ नोव्हेंबर रोजी पोस्टल मैदानावर दुपारी ३.३० वाजता होत आहे. राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरूष बॅटमिंटन निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीत स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा इनडोअर स्टेडियम (एमआयडीसी लोहारा) येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातील ४०० पेक्षा जास्त महिला व पुरूष खेळाडू सहभागी होणार आहेत.
लोकमत समूहातर्फे या स्पर्धेत १ लाख ५० हजार रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. तसेच विजेत्या व उपविजेत्या संघांना एकूण आठ आकर्षक चषक लोकमत मीडिया प्रा.लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्यातर्फे दिले जाणार आहेत. यवतमाळ येथील प्रसिद्ध हनुमान आखाड्यात २५ नोव्हेंबर रोजी इनामी काट्या-कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
पंडित बुद्धदित्य मुखर्जी यांचा अल्प परिचय
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर आपल्या खास शैलीच्या सितार वादनाने श्रोत्यांवर अमिट छाप सोडणारे पंडित बुद्धदित्य मुखर्जी हे इमदादखानी घराण्याचे सितार वादक आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीत साधनेला प्रारंभ केला. वडील पंडित भीमालेंदू मुखर्जी यांच्याकडून त्यांनी सितार वादनाचे धडे घेतले असून तेच त्यांचे गुरू आहेत. त्यांच्या सितार वादनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते गायकीच्या अंगाने सितार वादन करतात. यामुळेच त्यांची वेगळी ओळख संगीत क्षेत्रात आहे. १९७७ मध्ये मेट्यालुरिजकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. त्यांच्या सितार वादनाचे कार्यक्रम २६ देशात झाले असून ३० जून १९९० मध्ये लंडनच्या हाऊस आॅफ कॉमन्समध्ये त्यांच्या सितार वादनाचा कार्यक्रम झाला होता. आतापर्यंत त्यांनी १२ आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले. वयाच्या २० व्या वर्षी कोलकाता येथे झालेला पंडित बुद्धदित्य यांचा कार्यक्रम हा दिग्दर्शक सत्यजित रे नंतर सर्वात मोठा होता. २० जुलै २०११ रोजी त्यांना संगीत नाटक अकादमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. असा हा आंतरराष्ट्रीय कलावंत यवतमाळातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून बाबूजींना आदरांजली वाहणार आहे.
तबलावादक सौमेन नंदी
प्रसिद्ध तबलावादक सौमेन नंदी यांचा जन्म प्रसिद्ध शास्त्रीय घराण्यात झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी तबला वादनाचे धडे घेतले. पंडित पंकज चटर्जी यांच्या तालमीत ते वाढले. त्यानंतर त्यांनी पंडित अरूप चटर्जी यांच्याकडूनही तबल्यातील बारकावे शिकून घेतले. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे नियमित कलावंत असलेल्या सौमेन नंदी यांना भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. भुवनेश्वर येथील प्राचीन कला केंद्राच्या वार्षिक कार्यक्रमात आणि हैदराबाद व चेन्नई येथील राष्ट्रीय युथ फेस्टीवलमध्येसुद्धा त्यांनी तबलावादन केले आहे. सितारवादक पंडित बुद्धदित्य मुखर्जी यांच्या सोबत त्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. कोलकाता येथे आयोजित तानसेन संगीत समारोहात शामल चटर्जीसोबत तबलावादन केले. या सोबतच पंडित अमियारंजन बंडोपाध्याय, पंडित कार्तिककुमार, पंडित पार्थो चटर्जी यांनाही त्यांनी तबल्याची साथसंगत केली. सौमेन नंदी यांची तबल्याची वादन शैली अत्यंत वेगळी असून ती सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आहे. अशा प्रसिद्ध तबलावादकाला ऐकण्याची संधी यवतमाळकरांसाठी चालून आली आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २५ नोव्हेंबर रोजी दौरा खालील प्रमाणे.
सकाळी ७.४५ : जवाहरलाल दर्डा विमानतळ यवतमाळ येथे आगमन.
८ वाजता : दर्डा उद्यान येथे आगमन.
८ ते ८.३० : राखीव.
८.३० ते ८.४० : सखी मंच अध्यक्षा ज्योत्स्ना दर्डा यांचे स्मृतिस्थळ असलेल्या ‘शक्तिस्थळा’ला भेट व आदरांजली.
८.४५ : बाबूजींची समाधी असलेल्या प्रेरणास्थळावर आगमन.
८.४५ ते ९ : बाबूजींच्या संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थिती आणि वृक्षारोपण.
९ ते ९.४० : मनोगत.
९.४५ : जवाहरलाल दर्डा विमानतळाकडे प्रस्थान.