जवान चंदू चव्हाण मायदेशी
By admin | Published: January 22, 2017 05:14 AM2017-01-22T05:14:26+5:302017-01-22T05:14:26+5:30
चार महिन्यांपूर्वी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले, त्याच दिवशी अनावधानाने प्रत्यक्ष सीमा रेषा
नवी दिल्ली : चार महिन्यांपूर्वी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले, त्याच दिवशी अनावधानाने प्रत्यक्ष सीमा रेषा ओलांडून पलीकडे गेलेल्या चंदू बाबुलाल चव्हाण या भारतीय लष्कराच्या जवानास पाकिस्तानने शनिवारी सुखरूपपणे भारताकडे सुपुर्र्द केले.
दुपारी २.३० वाजता पंजाब सीमेवरील वाघा चौकीवर चंदूला पाक लष्कराने भारतीय सैन्याच्या हवाली केले. त्या वेळची जी दृश्ये वाहिन्यांवर दाखविली, त्यात चंदू गडद रंगाची पॅन्ट व काळे जर्किन अशा वेशात दिसला. त्याची रायफल व बहुधा लष्करी गणवेशासह अन्य सामानाची सॅक स्वतंत्रपणे दिली गेली. सूत्रांनुसार शिपाई चव्हाण याचे आधी ‘डिब्रिफिंग’ केले जाईल, वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यानंतरच त्याचे पुढे काय करायचे किंवा त्याला पुढे कुठे जाऊ द्यायचे हे ठरविले जाईल. धुळे जिल्ह्यातील बोरविहीरचा २२ वर्षांचा चंदू लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या ३७ व्या बटालियनमध्ये तैनात होता. काश्मीरच्या मेंधार सेक्टरमधील सीमाचौकीत नेमणुकीवर असताना तो २९ सप्टेंबर रोजी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. आमचा जवान चुकून तुमच्या हद्दीत आला आहे, हे भारताने त्याच दिवशी पाकला कळविले होते. परंतु पाकिस्तानने चंदू चव्हाण त्यांच्या ताब्यात असल्याचे १५ दिवसांनी म्हणजे १३ आॅक्टोबर रोजी मान्य केले होते.
भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
धुळे-जळगावात जल्लोष
भारतीय सैन्यदलातील राष्ट्रीय रायफल्स तुकडीचे जवान चंदू चव्हाण यांची शनिवारी पाकिस्तानने सुटका केली़ ही आनंदवार्ता चंदूच्या बोरविहीर
या गावी पोहोचताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला़
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़
सुभाष भामरे यांनी चंदूचे मोठे भाऊ भूषणना फोनवरून चंदू सुखरूप परतल्याची माहिती दिली़ त्यामुळे नातेवाइकांना अश्रू अनावर झाले होते़
चंदू चव्हाणना
भारताच्या ताब्यात सोपविल्याचे वृत्त टीव्हीवर झळकताच बोरविहीरला फटाक्यांची आतशबाजी सुरू झाली. गावातील तरुणांनी डीजेच्या तालावर
बेभान नाचत आनंदोत्सव साजरा केला.
औदार्यातही पाकिस्तानची कुरापत
सद््भावना म्हणून आणि सीमेवर शांतता व सलोखा कायम राखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण चंदू चव्हाण यास भारताच्या हवाली करत असल्याचे पाकिस्तानने म्हटले. हा मोठेपणाचा आव आणतानाही पाक कुरापत काढायला विसरला नाही.
चंदू चव्हाण अनावधानाने नव्हे, तर वरिष्ठांकडून वाईट वागणूक मिळत असल्याने तो स्वत:ला नेमून दिलेले ठिकाण सोडून आमच्या लष्करापुढे शरण आला होता. आम्हीच त्याचे भारतात परत जाण्यासाठी मन वळविले, अशा बढाया पाकिस्तानने मारल्या.