चिखली येथील जवान सियाचिनमधे कर्तव्य बजावताना शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 06:45 PM2021-08-02T18:45:57+5:302021-08-02T18:46:07+5:30
Armymen from Chikhali martyred while on duty in Siachen : बर्फाळ डोंगरावरून पाय घसरून ते खाली कोसळल्यामुळे त्यांना वीरमरण आले आहे.
चिखली : देशरक्षणार्थ सैन्यदलात दाखल झालेल्या चिखलीतील कैलास भारत पवार या लष्करी जवानाला वीरमरण आले आहे. ते महार बटालियनमध्ये कार्यरत होते. सियाचीन या अत्यंत खडतर ठिकाणी कर्तव्य बजावताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरून ते खाली कोसळल्यामुळे त्यांना वीरमरण आले आहे.
चिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हे गेल्या २ आॅगस्ट २०२० पासून महार बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. हिमालय पर्वतरांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमधील अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीत पारा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली असतो. अश्या अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी ते देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. अश्या अत्यंत दुर्गम आणि बर्फाच्छादित प्रदेशात कैलास पवार यांची एका वषार्ची ड्यूटी १ आॅगस्टला संपली होती. दरम्यान आपल्या सहकाऱ्यांसह कैलास सियाचीन ग्लेशियरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत होते. सियाचिन ग्लेशियर पर्यंत पाठीवर सामानाचे ओझे घेऊन जाणे आणि उतरून परत येणे हा प्रवास जवानांना पायीच करावा लागतो. तेथपर्यंत पोहचायला आणि तेथून खाली यायला प्रत्येकी चार दिवस लागतात. त्यानुषंगाने त्यांचा प्रवास सुरू होता. दरम्यान, खाली उतरत असतांना बर्फाळ डोंगरावरून कैलास यांचा पाय घसरला आणि ते बर्फावरून घरंगळत जावून खाली कोसळले. त्यांच्या सोबत असलेल्या जवानांनी त्यांना तेथून हलवले आणि उपचारासाठी लडाखच्या इस्पितळात दाखल केले. परंतू, उपचारादरम्यान १ आॅगस्ट रोजी कैलास पवार यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडिल, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
सहा महिन्यांची मिळाली होती सुटी !
शहीद जवान केलास पवार यांची ड्युटी १ आॅगस्टला संपली होती. अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्यानंतर ६ महिन्यांच्या सुटीवर ते चिखलीला येणार होते. मात्र, बर्फाळ डोंगर उतरताना दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. आपला मुलगा, भाऊ एकदोन दिवसात घरी येणार, म्हणून त्यांचे कुटूंबिय मोठ्या आतुरतेन वाट पाहत असताना तो शहीद झाल्याची बातमी येवून धडकल्याने पवार कुटुंबावर दु:खाचा हिमालयच कोसळला आहे. दरम्यान या दुर्देवी घटनेने सर्व तालुक्यावर शोककळा पसरली आहे.