जावेद खानला फाशीची शिक्षा
By admin | Published: March 9, 2016 05:54 AM2016-03-09T05:54:32+5:302016-03-09T05:54:32+5:30
येथील मानसी देशपांडे या तरुणीवर २००९मध्ये बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आरोपी जावेद खान उर्फ टिंगऱ्या यास सत्र न्यायालयाने २०१२मध्ये ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई
औरंगाबाद : येथील मानसी देशपांडे या तरुणीवर २००९मध्ये बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आरोपी जावेद खान उर्फ टिंगऱ्या यास सत्र न्यायालयाने २०१२मध्ये ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फाशीच्या शिक्षेत रूपांतरित केली.
न्या. ए. व्ही. निरगुडे आणि न्या. आय.के. जैन यांनी जावेदच्या शिक्षेत वाढ करून त्याला फाशीची शिक्षा देण्याची विनंती करणारे शासनाचे अपील मंजूर केले, तर जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठीचे जावेदचे अपील फेटाळले.
अहिंसानगरमधील अपूर्वा अपार्टमेंटमध्ये अनिकेत आणि मानसी देशपांडे हे भाऊ-बहीण राहत होते. १२ जून २००९च्या मध्यरात्री जावेद खान हबीब खान उर्फ टिंगऱ्या (रा. जालना) हा चोरीच्या इराद्याने देशपांडे यांच्या फ्लॅटमध्ये घुसला. घरात मानसी एकटीच होती. जावेदने तिचे हात-पाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला स्क्रू-ड्रायव्हरने जखमी केले. त्यानंतर कातरीने तब्बल २१ वार करून तिचा खून केला होता. जावेदने मानसीचा मोबाइल, सोन्याची अंगठी आणि ४५० रुपये चोरून नेले. सकाळी अनिकेत आल्यानंतर हत्येचा उलगडा झाला होता.
पोलिसांनी हॉटेलमधील वेटर जावेद खान यास २२ जून २००९मध्येच अटक केली. २४ जानेवारी २०१२ रोजी टिंगऱ्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. चोरीचा माल बाळगल्याच्या आरोपाखाली हॉटेलमालक प्रदीप चंडालिया व दुसरा वेटर राम बोडखे यांना दंड ठोठावला होता. त्यानंतर फाशीच्या मागणीसाठी सरकार पक्ष उच्च न्यायालयात गेला होता. (प्रतिनिधी)