जव्हारला होणार मेडिकल कॉलेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 03:23 AM2016-10-31T03:23:48+5:302016-10-31T03:23:48+5:30
कुपोषण बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर जव्हार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल
जव्हार : कुपोषण बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर जव्हार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यानी शनिवारी येथे केली.
डॉक्टरांच्या पथकासह महाजन हे जव्हार मोखाड्यात दिवाळीच्या फराळासाठी येणार होते. बालमृत्यू होत असताना दिवाळी कशी साजरी करता? असा सवाल शुक्रवारी विवेक पंडित यांनी केला होता. यावेळी आदिवासींचा फराळ मंत्र्यांना देणार आल्याचे पंडित यांनी जाहीर केले होते. याचा परिणाम म्हणून शनिवारचे सर्व नियोजित कार्यक्र म रद्द करून महाजन हे जव्हार शासकीय विश्रामगृहात आले आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी पालघर जिल्ह्यातील आरोग्य, आश्रमशाळा,रोजगार हमी अशा अनेक मूलभूत प्रश्न समस्यांचा पाढा श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांसमोर मांडला.
सर्व समस्यांबाबत मी सरकार म्हणून स्वत: लक्ष घालणार असल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी विवेक पंडित यांनी गिरीश महाजनाकडे जव्हार तेथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे अशी मागणी केली आणि त्यांनी ती तत्काळ मान्य करून तसे संबंधितांना निर्देशही दिले. यावेळी जे.जे.रु ग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने त्यांच्यासोबत होते. यावेळी श्रमजीवी संघटनेने आदिवासींचा फराळ गिरीश महाजन यांना दिला, त्यांनीही चवलं, कारांद्यांचा ( चवळी, कंदमुळे) आस्वाद घेतला.
पालघरमध्ये एका पाठोपाठ एक बालमृत्यू घडत असताना सरकार दिवाळी साजरी करण्यासाठी आदिवासीपाड्यावर येत असल्याने पंडित यांनी संताप व्यक्त केला. आम्ही सरकारला, मंत्र्यांना आदिवासींचा फराळ खायला देऊ असेही पंडित म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर हा दौरा चर्चेत आला होता. शनिवारी दुपारी गिरीश महाजन यांनी नियोजित पालघर दौरा रद्द करून थेट जव्हार विश्रामगृह गाठले यावेळी पंडित यांच्यासह श्रमाजीवीच्या पदाधिकार्यांनी वास्तव मंत्र्यांसमोर मांडले. येथील उपजिल्हा रुग्णालय २०० खाटांचे करण्याबाबत चार वर्षांपूर्वी निर्णय झाला. परंतु अजून विटही रचली गेली नाही. ते ३०० खाटांचे केल्यास येथे वैद्यकीय महाविद्यालय होऊ शकेल याकडे पंडित यांनी लक्ष वेधले, यावर प्रतिसाद देत जव्हार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घोषित केला. महाजन यांनी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत तब्बल दोन तास चर्चा केली. आणि प्रत्येक मुद्यावर संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले. यावेळी पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस अधिक्षिका शारदा राऊत , जव्हार तहसीलदार पल्लवी टेमकर उपस्थित होते.(वार्ताहर)
>आदिवासी गावी मंत्र्याची दिवाळी अंधारात
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.तात्याराव लहाने यांनी आपला दिवाळीचा पहिला दिवस मोखाडयातील बेरीस्ते या गावी साजरा केला. करोळ या ठिकाणी कुपोषण निर्मूलनाबाबत महाजन आणि डॉ. लहाने यांनी नागरिकांना मार्गदर्शन या नंतर बेरीस्ते येथील वनवासी कल्याण आश्रमात मुक्काम केला.
परंतु हा दौरा खाजगी असल्याने याकाळात त्यांनी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली नाही. तसेच कोणत्याही आश्रमशाळा प्राथमिक आरोग्यकेंद्र यांना भेटी दिल्या नाहीत. या कार्यक्र मापासून भाजप कार्यकर्ते, स्थानिक प्रशासनाला दूर ठेवले गेले होते.
या कार्यक्र मास महाजन नियोजित वेळेपेक्षा खूपच उशिराने आल्याने त्यांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली. आपले सरकार कुपोषण निर्मूलनासाठी कायम स्वरूपी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वनवासी कल्याण आश्रमाने केले होते.