जय मल्हार शाळेची मान्यता होणार रद्द
By admin | Published: February 27, 2017 02:27 AM2017-02-27T02:27:41+5:302017-02-27T02:27:41+5:30
पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार शाळेतील विद्यार्थिनींना चटके देण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती
मयूर तांबडे,
पनवेल- पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार शाळेतील विद्यार्थिनींना चटके देण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यातील आरोपी मुख्याध्यापिका सुविधा बेडदेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आदिवासी प्रकल्प कार्यालयाने या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे लवकरच ही शाळा बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश शाळेमध्ये एका शिक्षिकेचे १०० रुपये चोरीला गेल्यावरून शाळेच्या मुख्याध्यापिका बेडदे यांनी १८ जानेवारी रोजी इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी हर्षदा गंगाराम लेंडी (११) हिच्यावर व अन्य सात विद्यार्थिनींवर चोरीचा आरोप करत त्यांच्या शरीरावर लोखंडी उलथन्याच्या साहाय्याने चटके दिले होते. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेची कोणत्याही प्रकारची माहिती त्यांच्या पालकांनाही देण्यात आली नव्हती. ३० जानेवारी रोजी हर्षदाचे वडील शाळेत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली व जय मल्हार शाळेच्या मुख्याध्यापिकेवर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर येथील शिकणाऱ्या मुलांच्या शालेय जीवनावर परिणाम होणार होता. या शाळेत ३२ निवासी विद्यार्थी, तर इतर ५५ विद्यार्थी शिकत आहेत. मात्र, आदिवासी प्रकल्प विभागाने या विद्यार्थ्यांची काळजी घेत त्यांना जवळच्या शाळेत पाठविले आहे. त्यामुळे या मुलांचे वर्ष वाया जाणार नाही. येथील विद्यार्थ्यांना सेंट अॅण्ड्रुज स्कूल, आकुर्ली, सुषमा पाटील शाळा कामोठे, तसेच कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल येथे पाठविण्यात आले आहे. तसेच जय मल्हार शाळा बंद करण्यात यावी, या संदर्भातील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सहायक प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांनी दिली. शाळेतील शिक्षकांना कठोर शिक्षा करण्याची मागणी पालक वर्गातून होत होती तसेच शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी देखील समस्त पालक वर्गातून उमटत होती. शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी शासनाकडे अप्पर आयुक्तांकडे प्रस्तावपाठविण्यात आला आहे. त्यामुळे या जय मल्हार शाळेची मान्यता रद्द केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
>जय मल्हार शाळेवर कारवाई केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना इतर नामांकित शाळेमध्ये पाठविण्यात आलेले आहे. त्यांची मान्यता रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
- दिवाकर काळपांडे,
सहायक प्रकल्प अधिकारी