जयदेव यांना राजचा आधार? ठाकरे संपत्ती वादाचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2016 05:16 AM2016-08-04T05:16:16+5:302016-08-04T05:16:16+5:30
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कथित इच्छापत्र त्यांनी स्वेच्छेने नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे केले आहे
दीप्ती देशमुख,
मुंबई- दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कथित इच्छापत्र त्यांनी स्वेच्छेने नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे केले आहे या आपल्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ जयदेव ठाकरे यांनी ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणांच्या सीडी बुधवारी उच्च न्यायालयात सादर केल्याने ठाकरे संपत्तीवरून दोन भावांमध्ये सुरु असलेल्या वादात तिसऱ्या भावालाही न्यायालयात साक्षीसाठी बोलावले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जयदेव यांच्या वकिलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०१२ मध्ये ठाणे येथे निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ वरील वाढत्या प्रभावासंदर्भात केलेल्या विधानांचा आधार घेत त्या भाषणांच्या सीडी सादर केल्या. पुराव्यांच्या कायद्यानुसार त्या सीडीमधील भाषण आपणच केलेले आहे, हे स्वत: राज ठाकरे यांनी न्यायालयात येऊन शपथपूर्वक सांगितले तरच या सीडी पुरावा म्हणून ग्राहय धरल्या जाऊ शाकतील. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे संपत्तीच्या दाव्यात जयदेव ठाकरेंकडून राज ठाकरे यांना साक्षीदार म्हणून बोलवले जाण्याची दाट शक्यता आहे.
बाळासाहेब सतत आजारी पडू लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’वरील वर्चस्व वाढू लागले. सर्व महत्वाचे निर्णय उद्धव ठाकरेच घेऊ लागले. बाळासाहेबांचे मानसिक संतुलन ठीक नसताना वादग्रस्त इच्छापत्र तयार करण्यात आले, असा आरोप जयदेव यांनी याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्या या दाव्याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सेंट्रल मैदानावर केलेल्या भाषणाचा आधार घेतला आहे. जयदेव यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी बुधवारी न्या. गौतम पटेल यांच्यापुढे राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सेंट्रल मैदानात २०१२ मध्ये केलेल्या भाषणाची सीडी सादर केली.
२००६ मध्ये शिवसेना सोडून स्वतंत्र चूल मांडणारे राज ठाकरे यांनी २०१२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. उद्धव ठाकरे विश्वासार्ह नसल्याची, मातोश्रीवर त्यांचेच चालते, अशी जाहीर विधाने केली होती.
>बाळासाहेबांना केलेल सर्व कॉल्स उद्धव ठाकरे उचलतात. बाळासाहेबांपर्यंत निरोप पोहचतच नाहीत आणि याबद्दल बाळासाहेबांकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा सूर राज ठाकरे यांनी २०१२ मध्ये आळवला होता.
आता याच टीकेचा फायदा जयदेव यांनी घेतला आहे. जयदेव यांचेही दाव्यात असेच म्हणणे असल्याने त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाच्या सीडी उच्च न्यायालात सादर केल्या आहेत. त्यामुळे ठाकरे संपत्ती वादात राज ठाकरेही साक्षीदार म्हणून हजर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
>उद्धव-राज भेटीचे इंगित : उद्धव व राज ठाकरे यांच्या गेल्याच आठवड्यात ‘मातोश्री’वर झालेल्या भेटीने सगळ््यांच्या भुवया उंंचवल्या. दुरावलेल्या या दोन भावांनी बंद खोलीत भेटण्याने सामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. ठाकरे कुटुंबीयांनी ही भेट ‘कौटुंबिक’ आहे, असे जाहीर करून या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पण ठाकरे संपत्ती वादाला जयदेवकडून दिल्या जात असलेल्या वळणाशी तर या भेटीचा संबंध नसावा ना, अशी नवी शक्यता आता चचिर्ली जात आहे.