मराठी रंगभूमीचा ‘जयंत’ सन्मान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 01:52 AM2016-10-16T01:52:03+5:302016-10-16T01:52:03+5:30

यंदाचे ‘विष्णुदास भावे नाट्यगौरव पदक’ ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाले आहे. रंगभूमी दिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर

'Jayant' honor of Marathi theater! | मराठी रंगभूमीचा ‘जयंत’ सन्मान..!

मराठी रंगभूमीचा ‘जयंत’ सन्मान..!

googlenewsNext

- राज चिंचणकर

यंदाचे ‘विष्णुदास भावे नाट्यगौरव पदक’ ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाले आहे. रंगभूमी दिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते हे पदक त्यांना सांगली येथे प्रदान केले जाणार आहे. यानिमित्ताने या ज्येष्ठ रंगकर्मीच्या आयुष्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

नाट्यसृष्टीत एवढे उन्हाळे-पावसाळे पाहिल्यानंतरही जयंतराव स्वत:ला ‘छोटा माणूस’ म्हणवून घेतात, याहून अधिक विनयाचे मोठे उदाहरण ते कोणते? वयाची ऐंशी पार करताना, यापुढेही रंगभूमीची सेवा करता यावी, असे साकडे जयंतरावांनी नियतीला घातले आहे. अर्थात, त्यांची ही मागणी नियतीला अमान्य करून चालणारच नाही; कारण तब्बल तीन पिढ्यांच्या मायबाप रसिकांचे भक्कम पाठबळ जयंतरावांच्या मागे आहे. जयंत सावरकर तमाम मायबाप रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य करीत आहेत आणि रसिकांचे प्रेम हीच त्यांच्यासाठी खरी पावती आहे.

प्रायोगिक, व्यावसायिक, संगीत आणि बालरंगभूमीसह दूरचित्रवाणी व चित्रपटांतून गेली तब्बल सहा दशके एक वामनमूर्ती मायबाप रसिकांचे कायम लक्ष वेधत राहिली आहे. अभिनयाच्या प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या या व्यक्तीने कधी प्रमुख भूमिका साकारल्या नसतील; परंतु चरित्र भूमिका रंगवूनही ही व्यक्ती रसिकांच्या सदैव स्मरणात राहिली; नव्हे तिने रसिकांच्या मनात अढळस्थान प्राप्त केले. ही व्यक्ती म्हणजे याच वर्षी वयाचे सहस्रपूर्णचंद्रदर्शन साजरे करणारे ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर! या आनंदात अगदी केशर पडावे असा योग त्यांच्या आयुष्यात यंदा जुळून आला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जयंत सावरकर यांना जाहीर व्हावा याहून मोठा सन्मान तो कुठला? आतापर्यंत अनेक मानसन्मानांचे अनुभव असणारे जयंत सावरकर म्हणजेच मराठी रंगभूमीवरचे अण्णा, या पुरस्काराने भारावून गेले नसतील तरच नवल! ५ नोव्हेंबर रोजी, रंगभूमी दिनी जेव्हा त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल; तेव्हा तो समस्त मराठी नाट्यसृष्टीचाच गौरव असेल यात शंका नाही.
पावणेदोनशे वर्षांचा देदीप्यमान इतिहास सांगणाऱ्या मराठी रंगभूमीवर ज्यांच्या नावाने दबदबा निर्माण केला; त्या नटवर्य केशवराव दाते, मास्टर दत्ताराम, मामा पेंडसे, दामू केंकरे, विजया मेहता, सुधा करमरकर आदी ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मींच्या सोबत काम करण्याचे भाग्य जयंत सावरकर यांना लाभले. त्यायोगे ते रसिकजनांच्या तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्या कार्यातून रिझवत राहिले असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. या ज्येष्ठ मंडळींपासून अलीकडच्या काळातल्या दिग्दर्शकांसोबत जयंतराव त्याच उत्साहाने काम करत राहिले.
जयंतरावांचे बालपण अनेक चटके सोसण्यात गेले. ऐन उमेदीच्या काळात त्यांनी विविध व्यवसाय करून पोटापाण्याची व्यवस्था लावली. हे सगळे करत असताना त्यांच्या मनात नाटकाचे खूळ ठाण मांडून बसले होते. त्याचा निचरा होणे ही त्यांची गरज होती आणि हेच खूळ मराठी रंगभूमीला एक समर्थ अभिनेता देणार होते, याची सुतराम कल्पनाही जयंतरावांना तेव्हाच्या विवंचनेत असण्याचे कारणच नव्हते. बॅकस्टेज वर्करपासून त्यांची रंगभूमीवर अखंड सेवा सुरू झाली आणि पुढची ६० वर्षे रंगभूमीने त्यांचा खुल्या दिलाने सांभाळ केला. नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी यांच्यापासून नव्या पिढीतल्या नाटककारांच्या शब्दांना जयंतरावांनी तितक्याच समर्थपणे मायबाप रसिकांपर्यंत पोहोचवले.
आज वयाच्या ८०व्या वर्षीही ते तंदुरुस्त असून, दोन व्यावसायिक नाटकांतून भूमिका रंगवत आहेत. आजही जयंतरावांची बुद्धी अतिशय तल्लख आहे आणि अनेक नाटके त्यांना तोंडपाठ आहेत. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमातून त्यांच्या वाणीतून त्यांच्या या बुद्धीचे तेज प्रकर्षाने उजळते आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात. गेली ६० वर्षे त्यांचे वसतिस्थान असलेल्या गिरगावातल्या इमारतीच्या ५४ पायऱ्या रोज वरखाली करणारे आणि रोज सकाळी लसणाची पाकळी तोंडात टाकून आरोग्याकडे आवर्जून लक्ष पुरवणाऱ्या जयंतरावांचा आदर्श आजच्या पिढीच्या कलावंतांनी ‘फिटनेस-गुरू’ म्हणून ठेवायला हरकत नाही.
‘सूर्यास्त’, ‘एकच प्याला’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशीतैशी’, ‘तुझे आहे तुजपाशी’ अशा नाटकांपासून अलीकडच्या काळातल्या ‘ओ वूमनिया’ आणि ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकांपर्यंत जयंतरावांचा अभिनयाचा प्रवास अखंड सुरूच आहे. रंगभूमीवर एवढा मोठा प्रवास मी करीन याची मला खात्री नव्हती, असे ते नेहमी म्हणतात आणि नियतीने शेवटच्या श्वासापर्यंत मला रंगभूमीवर काम करायला द्यावे, अशी इच्छाही ते कायम व्यक्त करतात.

Web Title: 'Jayant' honor of Marathi theater!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.